मुलुंड टोल नाका, भक्तीपार्क शीव-चेंबूर रोड, माहुल ट्रॉम्बे इंडस्ट्रीअल, गणेशनगर कांदिवली ‘हॉट स्पॉट’

मुलुंड टोल नाका, भक्तीपार्क शीव-चेंबूर रोड, माहुल ट्रॉम्बे इंडस्ट्रीअल आणि कांदिवलीतील गणेशनगर हे मुंबईत सर्वाधिक तापमान असणारे ‘हॉट स्पॉट’ असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी असणारे उद्योगधंदे, वाहनांची गर्दी आणि प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱया घटकांमुळे या ठिकाणी तापमान सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष मुंबई महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग आणि ‘निरी’ संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर काढण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱया तापमानामुळे पालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून मुंबईत सर्वाधिक तापमान निर्माण होणारी ठिकाणे शोधून उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत वाहनांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे नेमक्या कोणत्या ठिकाणी हा प्रश्न निर्माण झाला आहे याचा शोध घेण्यात येत आहे. विशेषतः जंक्शनच्या ठिकाणी  तापमान वाढत असल्याचे समोर आले आहे.

‘हॉट’ स्पॉट असलेल्या भागात उष्णता कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाईल. उद्योग-व्यवसायातील कामे कमीत कमी उष्णता निर्माण होतील यासाठी उपाययोजना सुचवण्यात येतील. मोठय़ा प्रमाणात वाहने असणाऱया ठिकाणी, सर्वाधिक प्रदूषण असलेल्या ठिकाणी स्प्रिंकॊलर लावणे, प्रदूषण नियंत्रण, धूळ प्युरिफायर अशा यंत्रणा बसविण्यात येणार आहेत.