साहित्य जगत – वाचन दिशादर्शक

>>रविप्रकाश कुलकर्णी

वेगवेगळ्या ठिकाणी साहित्य पुरस्कार जाहीर होत असतात. त्याकडे मी आवर्जून लक्ष देतो. त्याचं कारण आपण कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, निदान चाळली तरी पाहिजेत हे लक्षात येतं. त्यात पुन्हा तो लेखक वा प्रकाशक नवीन असेल तर त्याकडे आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं, पण शेवटी पुरस्कार द्यायला संख्येची मर्यादा असतेच. त्यामुळे इतर पुस्तकांची माहिती होत नाही, कळत नाही. पुरस्कार देताना इतर कुठली पुस्तकं विचारात घेतली गेली हे कळत नाही. शिवाय वर्षभरात कोणकोणती पुस्तकं प्रकाशित झाली आहेत हे कळण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही. मग ती पाहायला मिळतील ही शक्यता तर फारच दूरची झाली. नव्हे, अशक्यच आहे!

अशा वेळी ‘ललित’ मासिकातर्फे ज्याची ओळख ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेलं मासिक, अशी सार्थ आहे. त्यांच्यातर्फे बृहन महाराष्ट्रातील चोखंदळ वाचकांच्या आवडीनिवडीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे घेतला जात आहे. दरवर्षी प्रकाशित झालेल्या विविध पुस्तकांतून जी पुस्तकं वाचली आणि त्यातील आवडलेल्या पुस्तकांचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो. वाचकांना पुढील वाचनासाठी ग्रंथांची निवड करण्यास मदत व्हावी हा यामागचा हेतू आहे. यामध्ये प्रत्येक वाचकाला आपल्या पसंतीची तीन पुस्तकं कळवायची असतात. आलेल्या पसंतीतून मग क्रमवारी लावली जाते.

2023 मधील या पाहणीत 101 वाचकांनी आपली निवड कळवली. वेगवेगळे वाचक काय काय वाचतात त्याचा थोडासा अंदाज यावरून येऊ शकतो. त्यासाठी एप्रिल 2024 चा ‘ललित’ मासिकाचा अंक आवर्जून वाचण्यासारखा आहे. त्यातही ज्या पुस्तकाला पसंती दिलेली आहे, त्याची निवडीनुसार ाढमवारी लावलेली आहे. अशी 23 पुस्तकं आहेत. त्यांची निवड 12 जणांपासून ते चार जणांपर्यंत आहे. निदान या पुस्तकाकडे लक्ष जावे. ही यादी पुढीलप्रमाणे- गुरू विवेकी भला-अंजली जोशी, मॅजेस्टिक, सह्याचला आणि मी-एक प्रेमकहाणी माधव गाडगीळ, राजहंस, कला, समाज, संस्कृती-दीपक घारे, मॅजेस्टिक, कानविंदे हरवले, हृषीकेश गुप्ते, मॅजेस्टिक, फ्री फॉल – गणेश मतकरी, मॅजेस्टिक, मनसमझावन संग्राम गायकवाड, रोहन प्रकाशन, अफसाना लिख रही हूं-मृदुला दाढे, रोहन प्रकाशन, … नाही मानियले बहुमता-नंदा खरे, संकलन-संपादन विद्या गौरी खरे मनोविकास प्रकाशन, नियतीचा विलक्षण खेळ नगरकर, चिमुलकर, आलमेलकर सुहास बहुळकर मॅजेस्टिक प्रकाशन, वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत राजहंस प्रकाशन, सत्यकथा निवडक कविता खंड 1-2 मौज प्रकाशन, आता वह्या सगळ्या बुडीत खाती अनुराधा पाटील शब्द प्रकाशन, सीसीटीव्हीच्या गर्द छायेत गीतेश शिंदे शब्दालय प्रकाशन, हिट्स ऑफ नाइन्टी टू पंकज भोसले रोहन प्रकाशन, आठवणींचा पायरव अंजली कीर्तने मॅजेस्टिक प्रकाशन, काल त्रिकाल नागनाथ कोत्तापल्ले सायन पब्लिकेशन, दिडदा दिडदा नमिता देवी दयाल अनुवाद – अंबरीश मिश्र मौज प्रकाशन, निर्वासित उषा रामवाणी गायकवाड उष:काल पब्लिकेशन, मीच एवढा शहाणा कसा श्रीकांत बोजेवार ग्रंथाली, र.धों.कर्वे समजून घेताना अनंत देशमुख अनघा प्रकाशन, या जीवनाचे काय करू? आणि निवडक अभय बंग राजहंस प्रकाशन, वेदनेचा ाtढस लक्ष्मीकांत देशमुख मॅजेस्टिक प्रकाशन, श्वासपाने राही अनिल बर्वे पॉप्युलर प्रकाशन.

याखेरीज आणखी कोणती विशेष पुस्तकं हवी असतील तर ‘ललित’ एप्रिल 24 चा अंक पाहावा. ‘चोखंदळ वाचकांची निवड – 2023’ हा विभाग पाहावा. ही निवड करणाऱया वाचकांच्या गावांची ाढमवारी अशी (कंसात निवड करणाऱयांची संख्या) मुंबई (33), पुणे (19), ठाणे (10), डोंबिवली (7), कोल्हापूर (6), अकोला (3), नगर, गोवा, कल्याण, सोलापूर (या गावातून प्रत्येकी दोन जणांनी निवड कळवली) आणि अलिबाग, अमरावती, बीड, छत्रपती संभाजी नगर, बेळगाव, गडचिरोली, जळगाव, महाबळेश्वर, नाशिक, नागपूर, नांदेड, पालघर, पनवेल, रत्नागिरी, सावंतवाडी, सातारा, तळेगाव, विरार, वर्धा या ठिकाणाहून वाचकांनी आपली पसंती कळवली आहे.

ही गावांची यादी देण्याचं एवढंच कारण की, अजून कितीतरी गावांपर्यंत प्रकाशकांनी पोहोचले पाहिजे. निदान तिथल्या वाचकांपर्यंत पुस्तकांबाबत उत्सुकता निर्माण करायला हवी अशी अपेक्षा करावी काय?