नितीश कुमार स्वत:च पाच भावंडे, घराणेशाहीवरून तेजस्वी यादव यांचा  हल्ला

सातत्याने घराणेशाहीवरून टीका सहन करावी लागणाऱया तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर पलटवार केला आहे. नितीश कुमार स्वतः पाच भाऊ-बहीण असून लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाबद्दल बोलणाऱयांनी आधी स्वतः जरा माहिती मिळवायला हवी, असा टोलाही तेजस्वी यादव यांनी लगावला आहे.

बिहारमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने सध्या तेजस्वी यादव यांना घराणेशाहीच्या मुद्दय़ावरून घेरले आहे. लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या मुलांची गणना करतानाच त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले, मात्र या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत तेजस्वी यादव यांनी देशातील मोठय़ा नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांची यादीच बाहेर काढली. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर 14 भाऊ-बहीण होते तर जे लोक लालूप्रसाद यांच्यावर घराणेशाहीवरून टीका करत आहेत, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, हिंदुस्थानच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः 14 भाऊ आणि बहीण होते, सुभाषचंद्र बोस हेदेखील 14 भाऊ-बहीण होते तर नितीश कुमार स्वतः पाच बहीण-भाऊ आहेत. तसेच अटलबिहारी वाजपेयीदेखील 7 भाऊ-बहीण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मेदी यांना 6 भाऊ-बहीण आहेत. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना 10 भाऊ-बहीण आहेत तर माजी पंतप्रधान देवेगौडा आणि नरसिंह राव यांचीही मुले आहेत, परंतु जेव्हा टीका होते तेव्हा यांना केवळ लालूप्रसाद यादव यांचेच कुटुंब दिसते, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला आहे.