सोलापुरात वंचितच्या उमेदवाराची माघार; प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात होणार थेट लढत

राखीव मतदारसंघ असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात आज वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी पक्ष कार्यकारिणी आणि भाजपवर टीका करत दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेऊन सर्वांना धक्का दिला. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता सोलापूरची थेट लढत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात होणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यातील लढत रंगतदार होणार अशी आधीच चर्चा सुरू होती. मात्र वंचितने राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिल्यामुळे ही लढत तिरंगी होईल, अशी शक्यता होती. मात्र आज राहुल गायकवाड यांनी अर्ज मागे घेतल्याने प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे.

दोन्ही पक्षांची मते काँग्रेसलाच मिळणार

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एमआयएमनेदेखील उमेदवार न देण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. त्यात आता वंचितच्या राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्यामुळे या दोन्ही उमेदवारांची मते प्रणिती शिंदे यांच्या पारडय़ात पडणार आहेत. एमआयएम आणि वंचितनेही प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला नसला तरी दोन्ही पक्षांनी भाजपविरोधात उघड भूमिका घेतल्यामुळे ही मते काँग्रेसलाच मिळणार आहेत, यात शंका नाही.

मला बंदूक दिली, पण गोळ्य़ा नाहीत

राहुल गायकवाड यांनी एका व्हिडीओद्वारे भावनिक संदेश दिला आहे. यात त्यांनी वंचित आणि भाजपवर टीका केली आहे. ते व्हिडिओत म्हणतात, ‘‘मी 15 दिवसांत इथले वातावरण पाहिले. इथे प्रत्येक जण स्वार्थासाठी लढत आहे. मला बंदूक तर दिली आहे, मात्र गोळ्या दिल्या नाहीत. छऱयासारख्या गोळ्या दिल्या आहेत. मला बाबासाहेबांचे स्वप्न वाचवायचे आहे. माझ्यामुळे भाजपचा उमेदवार जिंकेल, भाजपच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी मला कारणीभूत व्हायचे नाही.’’

पक्ष कार्यकारिणीत दलालांची घुसखोरी

उमेदवारी माघार घेण्याच्या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट करताना गायकवाड यांनी वंचितवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सोलापुरात आंबेडकरी जनता चळवळीसाठी संवेदनशील आहे. मात्र पक्षाची कार्यकारिणी चळवळीसाठी पोषक नाही. त्यात पोकळपणा आहे. काही अपवाद वगळता अनेक दलालांची घुसखोरी झाली आहे. त्यांना सोबत घेऊन मी निवडणुकीची लढाई करू शकत नाही.