निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा अख्खं जग पाहतंय – आदित्य ठाकरे

महाराष्ट्राचा श्वास असलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ या मंत्राचा शिवसेनेच्या मशाल गीतातील उल्लेख निवडणूक आयोगाला खटकला. पण भाजपबाबत मात्र त्यांचे वेगळे नियम आहेत, असे नमूद करत शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या प्रचाररथावर बोट ठेवले आहे. ‘जो राम को लाए है हम उनको लाएंगे’ अशी घोषणा असलेला रथ भाजपचे उमेदवार फिरवत आहेत. तरीही त्यावर आयोगाकडून कोणताच आक्षेप घेण्यात आलेला नाही. सगळं जग निवडणूक आयोगाचा हा पक्षपातीपणा पाहत आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी फटकारले. ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणण्यास आम्हाला का बंदी घालण्यात आली? कारण आम्ही भाजप नाही? किंवा महाराष्ट्रविरोधी शक्ती पेंद्रात सत्तेत आहे म्हणून? असे खरमरीत सवालही आदित्य यांनी केले. निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणुकांची परंपरा संपुष्टात आणण्याचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यावासाठी आम्ही लढत आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.