मशाल गीतामधून जय भवानी हटवणार नाही; निवडणूक आयोगाचा फतवा उद्धव ठाकरे यांनी धुडकावला

हिंदू हा तुझा धर्मम्हणण्यात गैर काय आहे? आजपर्यंत आम्ही कधीही भगवान के नाम पे दे दे बाबाअसे म्हणून मते मागितली नाहीत. तशी मते भाजप मागत आहे.

आम्हीही रामभक्त आहोत, हनुमानभक्त आहोत. आई तुळजाभवानीही महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. ‘जय भवानी जय शिवाजीआणि हर हर महादेवआम्ही बोलणारच.

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असा आरोप भाजपकडून केला जातो. मग ज्यांच्या हाताखाली आयोग काम करतो त्या मोदी सरकारने सांगावे की हिंदू धर्म हा शब्द काढायला लावणे योग्य आहे का?

 शिवसेनेच्या मशाल गीतामधून ‘हिंदू धर्म’ आणि ‘जय भवानी’ हे शब्द काढण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा लेखी फतवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीरपणे धुडकावून लावला. भवानी माता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, तिचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे. शिवसेना ते कदापि सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बजरंग बली, प्रभू श्रीरामाच्या नावावर मते मागतात ते चालते का? आधी त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करतानाच, हुकूमशाहीसमोर शिवसेना झुकणार नाही आणि मशाल गीतामधून ‘जय भवानी’ शब्द काढणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

‘मातोश्री’ निवासस्थानी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मशाल गीतामधील शब्दांवर आक्षेप घेणाऱया निवडणूक आयोगासह मोदी-शहांचाही कठोर शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, शिवसेनेची निशाणी आता मशाल आहे. निवडणुकीत एक प्रेरणागीत लागते. पूर्वीचे शिवसेना गीत आजही गावागावांत, खेडय़ापाडय़ात जनता वाजवते, ऐकते, गाते. तसेच मशाल गीत शिवसेनेने गेल्याच आठवडय़ात महाराष्ट्रासमोर ठेवले. ‘हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हे मर्म…’ अशा त्यातील ओळींमधील हिंदू धर्म हा शब्द तसेच गाण्याच्या बॅकग्राऊंडला असलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेमधील जय भवानी शब्द काढा, असा फतवा निवडणूक आयोगाने काढला आहे, मात्र हा फतवा आम्हाला मान्य नाही, असे उद्धव ठाकरे गरजले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते.

हा महाराष्ट्राच्या कुलदेवतेचा अपमान

आई तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलदेवता आहे. तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिले होते. भवानी तलवारीचा प्रसंगही सर्वांच्या हृदयात कोरला गेला आहे. एखाद्या गोष्टीची सुरुवात झाली की भवानी झाली असे आपण म्हणतो. ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा जनतेच्या हृदयात आहे. महाराष्ट्राच्या कडेकपाऱयात, गल्लीबोळात ती घोषणा दिली जाते. महाराष्ट्राच्या कुलदेवताचा अपमान आयोगाने केला असा आरोप शिवसेनेने केला तर तुमच्याकडे उत्तर आहे का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी आयोगाला केला. महाराष्ट्राबद्दल राज्यकर्त्यांमध्ये आकस सातत्याने दिसतोय, पण महाराष्ट्राच्या कुलदेवतेबद्दलही त्यांच्या नसानसात द्वेष आणि आकस इतका ठासून भरला असेल याची कल्पना नव्हती, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

आधी मोदी – शहांवर कारवाई करा

कर्नाटकच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय बजरंग बली बोलून बटण दाबा आणि मतदान करा असे आवाहन केले होते तर गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे सरकार सत्तेवर आणल्यास मतदारांना अयोध्येतील रामलल्लाचे विनामूल्य दर्शन घडवण्याचे आमिष मध्य प्रदेशात जाहीर सभेतून मतदारांना दाखवले होते. मोदी-शहांच्या त्या भाषणाचे ऑडिओ उद्धव ठाकरे यांनी यावेळी ऐकवले व मोदी-शहांना वेगळा न्याय आहे का? असा सवाल केला. शिवसेनेवर कारवाई करणार असाल तर आधी मोदी-शहांवर कारवाई करा, असे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला निक्षून सांगितले.

धर्माच्या नावावर मते मागितलेली नाहीत

शिवसेना नेते मनोहर जोशी यांची सर्वोच्च न्यायालयात केस झाली होती. त्यात हिंदुत्व व हिंदू धर्माची व्याख्या स्पष्ट केलेली आहे, असे सांगतानाच मशाल गीतामध्ये आम्ही कुठेही हिंदू धर्माच्या नावावर मते मागितली नाहीत, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला असा ठपका ठेवून त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला होता. तसेच त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली गेली होती. मग आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री धार्मिक प्रचार करताहेत त्यांना आयोगाने सूट दिली आहे का किंवा निवडणूक कायद्यात काही बदल केले आहेत का, असे शिवसेनेने निवडणूक आयोगाला विचारले होते त्याचे उत्तर आयोगाने अद्याप दिलेले नाही. उत्तर दिले नाही तर आयोगाने हा नियम बदलला आहे असे गृहीत धरून शिवसेना उद्या हर हर महादेव, जय भवानीबोलली तर आक्षेप असता कामा नये, असेही आयोगाला त्यावेळी कळवले होते, याची आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी करून दिली.