भाजपची लढाई ‘सत्तामेव जयते’साठी, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

आम्ही ‘सत्यमेव जयते’ च्या रक्षणासाठी लढतो आहोत. पण भाजप मात्र ‘सत्तामेव जयते’ असा नारा देत निवडणुकीच्या आखाडय़ात उतरली असल्याचा घणाघात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. भाजपच्या कथनी आणि करनीमध्ये जमीन अस्मानचे अंतर असल्याचा आरोपही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला.

परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी घनसांवगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संयुक्त सभा झाली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या दुटप्पीपणाचा जोरदार समाचार घेतला. ही लढाई लोकशाही विरूद्ध हुकुमशाही अशी आहे. देशाचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक असल्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने मत देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

भाजपच्या जाहीरनाम्यातील एकही गोष्ट खरी नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कर्जमाफीचा फायदा काही विशिष्ट लोकांनाच झाला. मात्र उद्धव ठाकरे यांनी केलेली कर्जमाफी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचली. मुळात भाजपला ना शेतकऱ्यांविषयी आस्था आहे ना नोकऱ्या मागणाऱ्या तरुणांविषयी. त्यांना फक्त सत्तेशी देणेघेणे असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. बिल्किस बानोच्या अपराध्यांचा जाहीर सत्कार भाजपने केला होता. यावरूनच त्यांची विकृत मानसिकता समोर येते. हीच यांची भूमिका असल्याचा हल्लाबोलही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.  यावेळी उमेदवार संजय जाधव, आमदार राजेश टोपे, उपनेते लक्ष्मण वडले, खासदार फौजिया खान, संपर्कप्रमुख शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, काँग्रेसचे प्रभाकर पार, बाजार समितीचे सभापती तात्यासाहेब चिमणे आदी उपस्थित होते.

पुन्हा एकदा लढावे लागणार

यावेळी बोलताना शरद पवार यांनीही भाजपवर कडक शब्दांत टीका केली. न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून निर्दयीपणा सिद्ध करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यावर कोणती कारवाई झाली? असा सवाल करून नोकरी मिळत नसल्याने वणवण करणाऱ्या तरुणांचा कधी भाजपने विचार केला आहे का? भाजपवर टीका केली की अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्यात आले. आमच्या वाडवडिलांनी मस्तवाल निजामाशी संघर्ष केला होता. आता पुन्हा तीच वेळ आली असल्याचे शरद पवार म्हणाले.