नातेपुते परिसरात अवकाळीचे थैमान

नातेपुते आणि परिसराला शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी वादळी वाऱयासह आलेल्या पावसाने झोडपून काढले. चाळीस ते पन्नास मिनिटे झालेल्या पावसाने निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. वादळामध्ये बाभळीची मोठी झाडे उन्मळून पडली. अनेक घरांचे नुकसान झाले. गारांच्या माऱयाने जनावरांसह अनेकजण जखमी झाले. या पावसात कोंबडय़ांचे खुराडे, शेळ्यांसाठी केलेले पत्र्याचे शेड, घराभोवती केलेले पत्र्याचे कुंपण वाऱयाने दूरपर्यंत फेकले गेले. या पावसाने शेती आणि फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी उभारण्यात आलेली सजावटीचेही पावसाने नुकसान झाले. मंडपमालक सुनील घुले यांनी याबाबत माहिती दिली. 14 एप्रिलपर्यंत पुन्हा नव्याने सजावट उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.