तुफान पावसात प्रणिती शिंदे यांच्या सभेला गर्दी

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काल सायंकाळी वादळी वाऱयासह तुफान पाऊस सुरू असतानाही बाळे येथील सभेला मतदारांनी गर्दी केली होती. प्रणिती यांच्या सभेची सोलापुरात चर्चा सुरू असून, शरद पवार यांच्या साताऱयातील पावसातील सभेची आठवण आल्याचे नागरिकांनी सांगितले.

प्रणिती शिंदे यांच्या उत्तर सोलापूर तालुका दौऱयाची काल बाळे येथे सांगता झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बाळे येथे प्रणिती श्ंिादे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाळे येथे सभा सुरू असताना अचानक वादळी वाऱयासह पावसाला सुरुवात झाली. अशा पावसातही प्रणिती शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी नागरिक थांबून होते. वादळी वारा व पाऊस सुरू असताना काही काळ वीजही गुल झाली; परंतु मतदारांचा प्रतिसाद कायम होता.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी गरीब व बेकारीविरुद्ध सुरू असलेला लढा आणि भाजपच्या दंडेलशाहीविरुद्ध ही निवडणूक असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, माजी नगरसेवक श्रवण भवर, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, मतदार मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रणिती शिंदे यांच्या पावसातील या सभेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.