कथा एका चवीची – चघळता चाळा-च्युईंगम

>>रश्मी वारंग

उन्हाळ्याचं नातं जसं गरमीशी तसंच गोळ्या, चॉकलेट, सरबतांशीही जोडलेलं. अशा कंटाळवाण्या उन्हाळी सुट्टीतला बच्चे कंपनीचा आवडता सहज चाळा म्हणजे च्युईंगम. ‘वाईट सवय’ ते ‘कूल फॅशन’ अशा दोन टोकांच्या मतांनी पारखल्या जाणाऱया च्युईंगमची, आपल्या बोलीभाषेतील चिंगमची ही गोष्ट.

च्युईंगम हा नव्याने शोधला गेलेला पदार्थ असावा असा आपला समज, पण दहा हजार वर्षांपासून नैसर्गिक रूपात च्युईंगम अस्तित्वात आहे. फार पूर्वी ग्रीक मंडळी विशिष्ट वृक्षाचा पिवळसर रंगाचा डिंक चघळत दात स्वच्छ करून मुखदुर्गंधीला पळविण्यासाठी हा उपाय करत असत. अमेरिकन इंडियन मंडळी रबराच्या झाडाच्या चिकापासून बनलेली राळ चघळत असत. सॅपोडीला नामक झाडापासून तयार डिंकसुद्धा गमसारखा चघळला जायचा. त्यामुळे तहानेची भावना व भूक नाहीशी होत असे. हे सारे आद्य च्युईंगमचे प्रकारच म्हणता येतील. मुळात असं काहीतरी चघळण्याचा चाळा माणसाला पूर्वीपासून होता. अगदी काही नाही तर गवताची काडी तरी चघळली जात असे. अशा या चघळण्याच्या सवयीला व्यावसायिक पदार्थांच्या रूपात च्युईंगम म्हणून 1848साली जॉन बी. कर्टिस यांनी उपलब्ध करून दिलं. पोर्टलँडमधील मेन या भागात जगातील सर्वात पहिली च्युईंगम फॅक्टरी त्यांनी सुरू केली. मात्र सुरुवातीच्या काळात च्युईंगमला कोणताही स्वाद नसे. स्वादरहीत च्युईंगगमला जॉन कॉलगन यांनी स्वाद प्राप्त करून दिला.

सुरुवातीच्या काळात च्युईंगम खाण्याचे नियम होते. जेनिफर मॅथ्यूज यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी नमूद केलं आहे की, फक्त मुलं आणि कुमारिकांना सार्वजनिकरीत्या च्युईंगम खाण्याची परवानगी होती. विवाहित स्त्री-पुरुषांनी एकांतात च्युईंगम खावे असा नियम होता. चारचौघांत च्युईंगम चघळणे आजही असभ्य समजले जाते.

च्युईंगम लोकप्रिय करण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर केला गेला. त्यात विल्यम्स रिंग्ले यांचं नाव घ्यावंच लागेल. फोनधारकांना मोफत च्युईंगम देणं, पहिल्या वा बाळाला दात आलेले नसणार हे ओळखून बाळाच्या दुसऱया वा गिफ्ट म्हणून च्युईंगम पाठवणं, च्युईंगमसोबत मोफत बेसबॉल कार्ड देणं अशा अनेक व्यावसायिक क्लृप्त्या त्यांनी वापरल्या. ज्याचा परिणाम म्हणजे च्युईंगम लोकप्रिय झालं.

1928 मध्ये वॉल्टर डायमर नव्या च्युईंगमवर प्रयोग करत असताना ते अधिक ताणलं जातंय असं त्यांच्या लक्षात आलं आणि यातून बबलगमचा जन्म झाला. तोंडातून बबलगमचे फुगे फुगवणं असभ्य असलं तरी कुमारवयीन मुलांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती.

आज च्युईंगम फॅशनपेक्षा अधिक चेहऱयाच्या आखीवरेखीवपणाशी जोडलं गेलंय. जबडय़ाच्या आसपासचा भाग फुगीर दिसू नये यासाठी जबडय़ाला द्यायच्या व्यायामाचे साधन म्हणून अधिकतर च्युईंगमकडे पाहिलं जातं. एकाग्रचित्त होण्यात च्युईंगम मदत करतं असं काही संशोधकांचं म्हणणं आहे, तर काहींच्या मते शुगरलेस च्युईंगगम दात मजबूत करू शकतं. च्युईंगम गिळलं तर सात वर्षं पोटात राहतं ही मात्र निव्वळ अफवाच!

च्युईंगम खाणं ही फारशी चांगली सवय कधीच मानली गेली नाही. तरीही बाजारात असणाऱया विविध च्युईंगमबद्दल बच्चे कंपनीला आकर्षण वाटत राहतं. कपडय़ांना वा केसांना च्युईंगम चिकटवून खोडी काढणाऱया चिल्ल्यापिल्ल्यांचा एक वेगळाच वर्ग आहे. त्यापलीकडे च्युईंगम म्हणजे गोळी वा चॉकलेटसारखं न विरघळता आपल्या सोबत राहणारा एक चघळता चाळाच!

(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)