Lok Sabha Election 2024 : राजस्थानात जाट समाजाचे भाजपविरोधात ऑपरेशन गंगाजल

राजस्थानात भारतीय जनता पार्टीला विरोध वाढतच चाललाय. भरतपूर जिह्यात जाट समाजाने भाजपाविरोधात गावोगाव फिरून ऑपरेशन गंगाजल सुरू केले आहे. भाजपकडून जाट समाजातील लोकांना टारगेट केले जात असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आज जाट समाजाच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले.

भाजपा उमेदवार रामस्वरूप कोली यांच्या एका प्रचार सभेत भाजपा कार्यकर्त्यांनी जाट समाजातील व्यक्तीला मारहाण केली होती. 10 वर्षांपासून भाजपला मतदान करत आलो आहे; पण जिंकल्यानंतर उमेदवार मतदारसंघाकडे फिरकतही नाही.

तुम्हीही गायब होऊ नका, असे जाट आरक्षण संघर्ष समितीच्या सदस्याने म्हटले होते. यावर नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला मारहाण केली होती. त्यामुळेच भाजपाविरोधात जाट समाजही आक्रमक झाल्याचे चित्र आहे. गावोगाव फिरून भाजपाविरोधात गंगाजल ऑपरेशन मोहीम उघडली असून त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे जाट आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक नेम सिंह फौजदार यांनी सांगितले. दरम्यान, प्रकरणी तीन दिवसानंतरही भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असेही ते म्हणाले.

आणखी एका जाट कार्यकर्त्याला मारहाण

चार वेळा सरपंच राहिलेले जाट आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक सुभाष मदरेणा यांचा जयपूरमधील सांगानेर परिसरातील एका जमिनीवरून वाद होता. याच प्रकरणात सुभाष मदेरणा यांना पोलिसांनी अटक केली. इतकेच नाही तर, मदेरणा यांना पोलिसांनी अर्धनग्न अवस्थेत बाजारातून फिरवले. याचाही जाट समाजात प्रचंड राग असल्याचे नेमसिंह फौजदार यांनी सांगितले.