अशोक चव्हाणांच्या प्रचारसभेकडे गावकऱयांची पाठ

मराठा समाजाकडून होत असलेला विरोध पाहता भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे सोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन फिरत आहेत. लोणी येथे जाहीर सभेपूर्वी पोलिसांनी चक्क सशस्त्र पथसंचलन केले. त्यामुळे संतापलेल्या गावकऱयांनी दारे लावून घेतली. अशोक चव्हाणांच्या सभेकडे एकही ग्रामस्थ फिरकला नाही. त्यामुळे सोबत आणलेल्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करून चव्हाणांवर माघारी परतण्याची नामुष्की ओढवली.

भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना जिल्हय़ात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवडय़ात कोंढा येथील ग्रामस्थांनी अशोक चव्हाणांना गावातही शिरू दिले नाही. अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता यांनाही प्रचार न करताच माघारी यावे लागले. जिल्हय़ातील पाटनूर आणि लोणी येथे एकाच दिवशी अशोक चव्हाण यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा आंदोलकांचा धसका घेऊन चव्हाणांनी सोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा आणला होता. लोणीत सभा सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी सशस्त्र्ा पथसंचलन केल्यामुळे गावात प्रचंड दहशत निर्माण झाली. संतापलेल्या गावकऱयांनी आपापल्या घराचे दरवाजे बंद करून घेतले.