Paris Olympic : अभियान प्रमुख पदावरून मेरी कोमचा राजीनामा, वाचा काय आहे कारण

पॅरिस ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वीच हिंदुस्थानसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज महिला बॉक्सर मेरी कोमची पॅरिस ऑलिम्पिकसाठी अभियान प्रमुख पदावर नेमणूक करण्यात आली होती. मात्र आता तिने या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र हिंदुस्थान ऑलिम्पिक महासंघाच्या (IOA) अध्यक्षा पी. टी. उषा यांना पाठवले आहे.

बॉक्सिंगची राणी म्हणून मेरी कोमला जगभरात ओळखले जाते. एक दोन नव्हे तर तब्बल 6 वेळा महिला विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेचा किताब मेरी कोमने आपल्या नावावर केला आहे. 41 वर्षीय मेरी कोमने हिंदुस्थानी ऑलिम्पिक महासंघाच्या (IOA) अध्यक्षा पी.टी. उषा यांना पत्र पाठवले आहे. “कोणत्याही स्वरूपात हिंदुस्थानची सेवा करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. आगामी जबाबदारीसाठी मी तशी मानसिक तयारी केली होती. मात्र, ही जबाबदारी मी पेलू शकणार नाही याची मला खंत आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे मी माघार घेत आहे,” असे मेरीने पी.टी. उषा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मेरी कॉमने पाठवलेल्या पत्रानंतर पी. टी. उषा यांनी मेरी कोमच्या जागी अन्य व्यक्तीच्या निवडी संदर्भात घोषणा करण्यात येईल, असे म्हटले आहे. “मेरिने केलेली विनंती मी समजू शकते. मी तिच्या निर्णयाचा आदर करते. मी तिला आश्वासन दिले आहे की IOA आणि माझा पाठिंबा तिच्यासाठी नेहमीच असेल. प्रत्येकाने त्यांच्या निर्णयाचा आणि गोपनीयतेचा आदर केला पाहिजे असे मला वाटते,”असे पी. टी.उषा यांनी म्हटले आहे.