हृदय-फुप्फुसाच्या दरम्यानची दोन किलो वजनाची गाठ काढली, जे. जे. रुग्णालयात तरुणाला जीवदान

पनवेलमधील एका वीस वर्षांच्या तरुणाच्या फुप्फुस आणि हृदयाच्या दरम्यानची तब्बल दोन किलो वजनाची गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात जे.जे. रुग्णालयाच्या उर-शल्य चिकित्सा विभागातील डॉक्टरांना यश आले आहे. अतिशय किचकट शस्त्रक्रिया डॉक्टरांनी संपूर्ण कौशल्य पणाला लावून यशस्वी केली. त्यामुळे या तरुणाला जीवदान मिळाले आहे.

पनवेलमधील विशाल कदम याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी पनवेलच्या खाजगी रुग्णालयात सिटीस्कॅन केल्यानंतर त्याचे फुफ्फुस आणि हृदयाच्या मध्ये गाठ दिसली. ही गाठ मोठी असल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला टाटा रुग्णालयात दाखवण्याचा सल्ला दिला. मात्र मुलाला टाटामध्ये नेण्यास पालक धजावले नाहीत. त्यामुळे त्यांनी विशालला जे.जे. रुग्णालयात दाखल केले.

जे.जे. रुग्णालयात केलेल्या सिटीस्कॅनमध्ये 12.14 सेमीची गाठ दिसली. ही गाठ कॅन्सरची नसल्याची खात्री करण्यासाठी तपासणीला पाठवली. रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे, अधीक्षक डॉ.  संजय सुरासे, विभागप्रमुख डॉ. मनोज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशालवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात घेतला. फुप्फुस आणि हृदयाच्या आवरणाला या गाठीचा भाग चिकटला होता. डॉक्टरांनी फुप्फुस व हृदयाला सांभाळून त्याला इजा न होता ही शस्त्रक्रिया केली.

डॉक्टरांच्या टीमचे यश

जे.जे. रुग्णालयाच्या उर-शल्य चिकित्सा शस्त्रक्रिया विभागाचे विभागप्रमुख  डॉ. मनोज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉ. सूरज नागरे, भूलतज्ञ डॉ. अश्विन सोनकांबळे, असिस्टंट प्रोफेसर डॉ. दीपक जयस्वाल, डॉ. अक्षय कुमार, डॉ. ज्योती रंजन तसेच स्टाफ वर्षा फेगडे, अंकिता यांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली.