13 अल्पवयीन बाल भिक्षेकरूची केली सुटका

मुंबई पोलिसांच्या विशेष बाल पोलीस कक्षाने मालाड येथे कारवाई करून 13 अल्पवयीन बाल भिक्षेकरूची सुटका केली. त्या 13 मुलांची रवानगी बालगृहात केली आहे. या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.

मालाड परिसरात बाल भिक्षेकरूकडून भिक्षा मागितली जाते अशी माहिती विशेष बाल पोलीस कक्षाला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. वरिष्ठ निरीक्षक नितीन पोतदार यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. बुधवारी पोलिसांनी मालाडच्या मिंट चौकी येथे कारवाई करून 13 अल्पवयीन बाल भिक्षेकरूंची सुटका केली. अल्पवयीन मुलांना भिक्षा मागायला लावून त्यावर उदरनिर्वाह करणाऱया चार जणांना ताब्यात घेतले. त्या चार जणांविरोधात बांगूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर सुटका केलेल्या 13 अल्पवयीन मुलांना बाल कल्याण समितीसमोर हजर केले.