विक्रोळीतील मुळीक कुटुंबीयांना अखेर मिळाला नवा फ्रिज, ग्राहक संरक्षण कक्षाचा एलजी वितरकाला दणका

नवीन फ्रिजमध्ये एक वर्षाच्या आत झालेला तांत्रिक बिघाडामुळे वितरकाकडे रितसर तक्रार करूनही त्याला दाद न देणाऱया वितरकाला अखेर शिवसेनेच्या ग्राहक संरक्षक कक्षाने दणका दिला. त्यामुळे वितरकाने तातडीने मुळीक कुटुंबीयांना नवा फ्रिज दिला. त्यामुळे मुळीक कुटुंबीयांनी ग्राहक संरक्षण कक्षाचे आभार मानले आहेत.

शिवसेना नेते, सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कक्षाचे सरचिटणीस विजय मालणकर, लोकसभा समन्वयक अजय शिरोडकर यांच्या सूचनेनुसार, ग्राहक संरक्षण कक्षाचे काम करताना फसवणूक झालेल्या ग्राहकाची किंवा तक्रारीची दाद न घेणाऱया कंपनी, वितरकाला दणका देऊन वठणीवर आणले जाते. विक्रोळी पार्कसाईटमधील श्रुती मुळीक यांनी 27 ऑक्टोबर 2023 ला आर. सिटी मॉलमधून 34 हजार 450 रुपये किमतीचा एलजी कंपनीचा फ्रिज विकत घेतला. फ्रिजचा गॅस पाच महिन्यांपासून लिकेज झाला होता. पाच महिन्यांपासून तक्रार करूनसुद्धा फ्रिज बदली करून देत नव्हते. त्यामुळे त्रस्त झालेल्या मुळीक यांनी घाटकोपर पश्चिम ग्राहक संरक्षण कक्षाचे 124 चे वॉर्ड संघटक यशवंत खोपकर यांच्याशी संपर्क करून न्याय मिळावा म्हणून विनंती केली. मुळीक यांची समस्या गांभीर्याने घेऊन घाटकोपर पश्चिम ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱयांनी स्वतः आर सिटी मॉल येथे जाऊन ग्राहकाची तक्रार निवारण करून श्रुती यांना एलजी कंपनीचा दुसरा नवीन फ्रिज मिळवून दिला. नवीन फ्रिज मिळवून दिल्याबद्दल मुळीक यांनी ग्राहक संरक्षण कक्षाचे पत्र देऊन आभार मानले. यावेळी विधानसभा संघटक अमित भाटकर, कार्यकारिणी चिटणीस श्रीकांत चिचपुरे, 123 वॉर्ड संघटक राजेंद्र पेडणेकर, सोशल मीडिया प्रसारक विकास डुकरे, गुरुदत्त पेडणेकर, विनायक जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.