विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबणे सत्ताधाऱयांसाठी पायंडा पडेल, केजरीवाल यांचा सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारवर हल्ला

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केलेली अटक योग्यच असल्याच्या दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बुधवारी केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत मला तुरुंगात डांबण्यात आले आहे. जर याचिकाकर्त्याला लोकसभा निवडणुकीत सहभागी होण्यासाठी तातडीने सोडले नाही तर निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबणे हे सत्ताधाऱयांसाठी पायंडा पडेल, अशा शब्दांत केजरीवाल यांनी मोदी सरकारकडून तपास यंत्रणांच्या आडून कारवाई करण्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

न्यायालयात काय घडले

केजरीवाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. ही याचिका मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याबाबत असून अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या पुराव्यांच्या आधारावर केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे, त्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे सिंघवी म्हणाले. यावर याबाबतचे तुमचे म्हणणे ई-मेल करावे त्यावर आम्ही विचार करू असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले. दरम्यान, याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.