रोज मरण मागताहेत पॅलेस्टिनी महिला; ईदच्या दिवशी नातलगांच्या कबरीजवळ बसून आक्रोश

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाला 8 महिने उलटून गेले असले तरीही युद्धाची धग जराही कमी झालेली नाही. रोज हल्ले होताहेत, रोज पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिक मरत असल्याचे चित्र आहे. आज ईद उल फीत्रच्या दिवशी गाझा पट्टीत मातम सुरू असल्याचे दिसले. लाखो नागरिकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली, कुणाचा पती, कुणाची मुले, कुणाची पत्नी, कुणाचे आईवडील मारले गेले आणि अनेक मुले पोरकी झाली. मदत शिबिरांमध्ये अन्न, पाणी मिळत नाही, वैद्यकीय सुविधा मिळत नाही, सतत हल्ल्याची भीतीत्यामुळे आम्ही तरी जगून काय करू, आज ईद असली तरी आमच्या घरात मातम आहे, असा आक्रोश ईदच्या दिवशीच नातलगांच्या कबरीजवळ बसून अनेक महिला करताना दिसल्या.

जेरूसलेम येथे लाखो पॅलेस्टिनींनी अल अक्स मशिदीत एकत्र येऊन प्रार्थना केली. एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मात्र दुसरीकडे गाझा पट्टीत भयंकर स्थिती होती. खायला अन्न नाही, पाणी नाही आणि जखमी अवस्थेत उपचार घेत असलेले लाखो पॅलेस्टिनी अशी परिस्थिती आहे. गाझामधील अमेरिकन इंटरनॅशनल शाळेत शिकवणाऱया 37 वर्षीय गणित शिक्षिकेने तिला कुठल्या संघर्षाचा सामना करावा लागला याबद्दल एका वृत्तवाहिनीला सांगितले. गाझा शहरातील मध्य भागात जन्माला आलेली आणि वाढलेल्या सुझान बरजाकचे आयुष्य सध्या अत्यंत भयावह झाले आहे. हल्ल्याच्या शक्यतेमुळे सुझानने हल्ल्यापूर्वीच घर सोडले म्हणून तिचे संपूर्ण कुटुंब वाचले. परंतु त्यानंतर रोज युद्धाच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याचे सुझानने सांगितले. तिचे चारही भाऊ इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यात मृत्युमुखी पडल्याचे तिने सांगितले.

 मदत शिबिरांमध्ये भयानक स्थिती

सुझान 12 वर्षीय मुलगा आणि पतीसह मदत शिबिरात राहत आहे. येथे प्यायला स्वच्छ पाणी नाही, अन्न नाही. वैद्यकीय सोयी सुविधा नाहीत, अशा स्थितीत जगावे लागत आहे. त्यामुळे अल्लाकडे रोज मरण मागत असल्याचे सुझानने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. एका ठिकाणी स्थिरस्थावर होतोय तोपर्यंत पुन्हा हल्ला होतो आणि मदत शिबिरांमधून दुसरीकडे जाऊन राहावे लागत असल्याचे सुझानने सांगितले.