लग्नासाठी पोरगी मिळेना; 1.30 लाखात तरुणीची खरेदी, पत्नीला विकण्यासाठी निघाला अन् बिंग फुटलं

महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. पण आजही सरकारी यंत्रणांच्या नजरेआड काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांच्या खरेदी विक्रीचा व्यापार राजेरोसपणे सुरू आहे. नारी शक्तीचा नारा देशभरात मोठ्या उत्साहाने दिला जात आहे. पण याच देशात एका महिलेला 1.30 लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

सदर घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. छत्तीसगडची रहिवासी असलेल्या काजलला (बदलेले नाव) तिच्याच भावाने 1.30 लाख रुपयांना मध्य प्रदेश राज्यातील शिवपूरच्या रविंद्रला विकले. राजेशचे लग्न होत नसल्यामुळे त्याने लग्न करण्यासाठी काजलला खरेदी केले होते. लग्न झाल्यावर काजलने रविंद्र सोबत राहण्यास नकार दिला आणि सतत माहेरी जाण्याचा हट्ट धरला. त्यामुळे रविंद्र आणि त्याच्या आई वडिलांनी तिला पुन्हा विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रविंद्र पीडितेला विकण्यासाठी राजस्थानला जाण्यासाठी निघाला.

रविंद्रच्या घरातील पाच जण तिला गाडीतून भरतपूर मार्गे राजस्थानला घेऊन निघाले होते. मात्र त्या मार्गावर पोलिसांची तपासणी सुरू होती. पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले आणि पीडितेने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यामुळे आरोपींचे बिंग फुटले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ आरोपी पती रविंद्र त्याची आई, वडील रघुपती, जावई भूपेंद्र जाट, मामी शारदा आणि दीपिका या सर्व जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविंद्रचे वय 22 वर्ष आहे. त्याचे लग्न ठरत नसल्यामुळे त्याने संबंधित तरुणीला तिच्या भावाकडून 1.30 लाख रुपयांना खरेदी केले होते. त्यामुळे पीडितेच्या भावाला सुद्धा अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.