बारामतीत भाजपमध्ये अस्वस्थता

बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची खेचाखेची सुरू केली असतानाच दुसरीकडे शरद पवार यांनी बारामती प्रत्येक टप्प्यावर बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. भाजपचा माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवले यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. तर दुसरीकडे पवार यांनी दौंड चे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतली. इंदापूर तालुक्यातील ताकतवान नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक आप्पा जगदाळे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतल्याने बारामती, इंदापूर आणि दौंड या तीन तालुक्यातील राजकीय उलथापालती वाढल्या असून, बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपमधील अस्वस्थता दिवसेंदिवस पुढे येत आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय होते किंबहुना प्रचार प्रमुख म्हणून इंदापुरात त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती परंतु ऐनवेळी माने यांनी अजित पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंदापूर तालुक्यात राजकारण ढवळून निघाले होते असे असतानाच आप्पा जगदाळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे इंदापूरमधील राजकीय उलथापालती वाढल्या आहेत. पाठव पाठव शरद पवारांनी दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतली.

भाजपाचे जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष ताकवले यांनी शरद पवार यांची मोदीबाग येथे भेट घेतली असून ते हातात तुतारी घेणार असल्याचे समजते. तसे केल्यास दौंड तालुक्यातील राजकीय गणिते बदलणार आहेत. नामदेव ताकवले यांचे समर्थन करणारा बारामती लोकसभा भाजपमध्ये मोठा गट असून त्यांचे ताकवले यांना समर्थन आहे.

बारामतीतील कार्यकर्त्यांचे म्हणणे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवडयात इंदापूर मध्ये भाजप कार्यकर्त्यांची सभा घेऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. त्यानंतर उद्या देवेंद्र फडणवीस हे पुरंदर तालुक्यात माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी येत आहेत. यानंतर आता बारामती तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी देखील आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बारामतीत या अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे. एवढे करूनही बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची नाराजी कायम आहे.