Lok Sabha Election 2024 : भाजपची दहावी यादी जाहीर, उदयनराजे वेटिंगवरच!

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची दहावी यादी आज भाजपने जाहीर केली. मात्र, या यादीतही सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नाही. उदयनराजे यांना वेटिंगवरच भाजपने ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक आणखी संतप्त झाले आहेत. दरम्यान, चंदीगडमधून किरण खेर आणि अलाहाबाद येथून रिटा बहुगुणा जोशी यांचे तिकीट कापले आहे.

भाजपने 2 मार्च रोजी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीतच उदयनराजे यांचे नाव जाहीर होईल, अशी आशा साताऱयातील त्यांच्या समर्थकांना होती. मात्र, 2 मार्चनंतर भाजपने आठ याद्या जाहीर केल्या; पण उदयनराजेंना वेटिंगवर ठेवले. मध्यंतरी उदयनराजे दिल्लीला जाऊन आले. पण, आज दहाव्या यादीतही त्यांचे नाव जाहीर झाले नाही. त्यामुळे साताऱयात उदयनराजे यांचे समर्थक संतप्त झाले आहेत.

पूनम महाजन यांची धाकधूक वाढली

महाराष्ट्रातील महायुतीतील जागा वाटपाचा घोळ अजून संपलेला नाही. त्यातून दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार दहाव्या यादीतही जाहीर झाला नाही. यामुळे पूनम महाजन यांची धाकधूक वाढली आहे.

उत्तर प्रदेशातील नऊ उमेदवार

भाजपने दहाव्या यादीत नऊ उमेदवार जाहीर केले. त्यात उत्तर प्रदेशातील सातजण आहेत. उत्तर प्रदेशातील मैनपुरी हा दिवंगत मुलायमसिंह यादव यांचा पारंपरिक मतदारसंघ. त्यांच्या निधनानंतर सूनबाई डिंपल यादव खासदार झाल्या. आता डिंपल यादव यांच्याविरोधात भाजपने जसविरसिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. बलिया मतदारसंघात दिवंगत माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर हे भाजपचे उमेदवार असतील. अलाहाबाद मतदारसंघात रिटा बहुगुणा जोशी यांचे तिकीट कापले असून, नीरज त्रिपाठी यांना उमेदवारी दिली आहे. तसेच चंदीगडमधून प्रसिद्ध अभिनेत्रीr किरण खेर यांचेही तिकीट कापले आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत. भाजपने येथे एस. एस. अहलुवालिया यांना उमेदवारी दिली आहे.