मामाच्या घरावर दावा करणाऱया भाच्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली; मामीच्या अधिकारावर केले शिक्कामोर्तब

मामाच्या निधनानंतर त्याच्या घरावर भाच्याने दावा केला. त्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने भाच्याची याचिका फेटाळून लावली. घरावर मामीचा अधिकार असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.

मामाला मूल नव्हते. त्याने मला दत्तक घेतले होते. घरावर माझा अधिकार असल्याचे प्रतिज्ञापत्र केले. त्यामुळे मामाच्या मृत्यूनंतर घराची मालकी माझ्याकडे आहे, असे भाच्याचे म्हणणे होते. न्या. संदीप मारणे यांच्या एकल पीठाने हे म्हणणे मान्य केले नाही.

 काय आहे प्रकरण

धारावी येथे ज्येष्ठ नागरिकाचे घर आहे. त्यांच्या दोन पत्नी होत्या, पण त्यांना मूल नव्हते. एका पत्नीचे निधन झाले. नंतर ज्येष्ठ नागरिकाचे निधन झाले. भाच्याने घरावर दावा केला. मामीने ज्येष्ठ नागरिक संरक्षण व देखभाल प्राधिकरणाकडे तक्रार केली. प्राधिकरणाने भाच्याला घराबाहेर जाण्याचे आदेश दिले. त्याविरोधात भाच्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

न्यायालयाचे निरीक्षण

भाच्याने केवळ प्रतिज्ञापत्र सादर केले. त्याव्यतिरिक्त मामाने दत्तक घेतल्याचा एकही पुरावा भाचा सादर करू शकला नाही. घराची मालकी मामीकडे आहे. तशी नोंद आहे. मात्र मामाने दत्तक घेतले होते हे सिद्ध करण्यासाठी व घराच्या मालकीसाठी भाचा स्वतंत्र न्यायालयीन दावा करू शकतो. ज्येष्ठ नागरिक प्राधिकरण ज्येष्ठांच्या हितासाठी आहे. प्राधिकरणाचे आदेश योग्य आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

भाच्याचा युक्तिवाद

मामाचे 2000 मध्ये निधन झाले. त्याआधी त्याने प्रतिज्ञापत्र केले. मला दत्तक घेतल्याचा व घराची मालकी मला दिल्याचा स्पष्ट उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे. मामीसोबत मामाचे हितपूर्वक संबंध नव्हते. म्हणूनच त्याने दुसरा विवाह केला. घराची मालकी मलाच मिळायला हवी. त्यासाठी हे प्रकरण पुन्हा प्राधिकरणाकडे पाठवावे, असा युक्तिवाद भाच्याने केला.

मामीचा दावा

माझ्या पतीने कोणालाही दत्तक घेतले नाही. घराचे अधिकार माझ्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. मी आणि माझे पती या घरात राहत होतो. अन्य कोणी आमच्यासोबत राहत नव्हते, असा दावा मामीने केला.