जगभरातून थोडक्यात बातम्या

शर्टच्या बटणामुळे मेट्रोमध्ये रोखले

एका तरुणाला बंगळुरू मेट्रोमध्ये चढू दिले नाही, कारण त्याच्या शर्टची बटणे खुली होती. मेट्रोच्या अधिकाऱयांनी तरुणाला शर्टची बटणे बंद करून स्वच्छ कपडय़ात मेट्रो स्टेशनवर यावे, अन्यथा त्याला मेट्रोमध्ये चढू दिले जाणार नाही, अशा सूचना दिल्या. दोडाकलासंद्रा मेट्रो स्टेशनवर उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनी या घटनेची नोंद करून ती व्हायरल केली. प्रवाशांनी पोस्टमध्ये बीएमआरसीएल आणि बंगळुरूच्या दक्षिण खासदार तेजस्वी सूर्याला टॅग केले. आम्ही सर्व प्रवाशांना समान वागणूक देतो. हा प्रवाशी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आला म्हणून त्याला रोखले, असे मेट्रो प्रशासनाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

युक्रेनच्या मदतीला अमेरिका

रशियाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईसाठी युव्रेनला अमेरिका मदत करत आहे. अमेरिकन लष्कराने युव्रेनला पाच हजार एके-47 रायफल्स सोपवल्या आहेत. त्यात एके-47, मशीन गन, स्नायपर रायफल, आरपीजी-7 लॉन्चर आणि पाच लाख राऊंडच्या गोळय़ांचा समावेश आहे.

पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळणार?

इस्त्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देण्याचे संकेत दिले. जागतिक शांततेसाठी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राची मान्यता देण्याची सूचना केली. परंतु, पॅलेस्टाईनच्या कारभारात हमास या दहशतवादी संघटनेची कोणतीही भूमिका नसावी, असे ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वाँग म्हणाल्या. इस्रायलच्या मदतीशिवाय ब्रिटन पॅलेस्टाईनला मान्यता देऊ शकेल, असे विधान जानेवारीत ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड पॅमेरॉन यांनी केले होते. पॅमेरॉन यांच्या वक्तव्याचे वाँग यांनी आपल्या भाषणात समर्थन केले.

2024 चा मार्च महिना सर्वात हॉट

जगात 2024चा मार्च महिना आतापर्यंतचा सर्वात हॉट महिना ठरला आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यानंतरचा म्हणजेच 10 महिन्यातील हा सर्वात हॉट महिना आहे. ज्याने तापमानात नवा रेकॉर्ड बनवला आहे. युरोपीय संघाच्या जलवायू एजन्सीने मंगळवारी ही माहिती दिली. कापरनिकस क्लायमेट चेंज सर्विस (सी3एस) ने दिलेल्या माहितीनुसार, सरासरी तापमान 14.14 डिग्री सेल्सियस राहिले. मार्च महिन्यात हे 1991-2020च्या सरासरीने 0.73 डिग्री सेल्सियस अधिक आहे. मार्च 2016च्या सर्वाधिक तापमानाच्या तुलनेत 0.10 डिग्री सेल्सियस अधिक आहे. गेल्या 12 महिन्यांत (एप्रिल 2023 ते मार्च 2024) मध्ये जागतिक सरासरी तापमानाची सर्वात जास्त नोंद झाली.

बायको हवी यासाठी इंजिनीअरची लिंक्डइनवर पोस्ट

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर एका इंजिनीअरने एक पोस्ट शेअर केली असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लिंक्डइन प्लॅटफॉर्मचा सर्वात जास्त वापर नोकरी शोधण्यासाठी केला जातो, परंतु एका सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाने बायको शोधण्यासाठी त्याचा वापर केला आहे. लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिले की, ज्युनियर वाईफसाठी जागा भरायची आहे. या पोस्टमुळे वाद उभा राहिला असून युजर्स वेगवेगळ्या कमेंट करीत आहेत.

काय आहे पोस्ट…
सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या जितेंद्र सिंह या तरुणाने एक पोस्ट शेअर केली. त्यात लिहिले की, तत्काळ नियुक्ती! माझ्या आयुष्यात एका ज्युनियर पत्नीची आवश्यकता आहे. तिच्या शोधात मी आहे. कृपया अनुभवी उमेदवारांनी अर्ज करू नये. मी अनुभवी उमेदवारांसाठी वेगळय़ा भरतीचे आयोजन करणार आहे.

एअर इंडिया कर्मचाऱयांची संपाची घोषणा

एअर इंडियाचे अनेक पायलट रजेवर गेल्याने वाहतूक आधीच विस्कळीत झालेली असताना आता कंपनीला आणखी अडचणीला सामोरे जावे लागू शकते. इंजिनीअरिंग सर्व्हिस लिमिटेडचे विमान टेक्निशियन्सने 23 एप्रिलला संपाची हाक दिली आहे. हे इंजिनीअर्स पगारात वाढ, प्रमोशन, युनिफॉर्म आणि अन्य दुसऱया मागणीसाठी संपावर जाणार आहेत. युनियनने एआयईएसएलचे सीईओ आणि सीएचआरओ यांना पत्र पाठवून आपल्या अडचणी सांगितल्या आहेत. कंपनीत सात वर्षे झाल्यानंतरही संबंधित कर्मचाऱयांना कोणतेही प्रमोशन दिले जात नाही. पगारात वाढसुद्धा केली जात नाही, असे म्हटले आहे.