‘प्रबोधन गोरेगाव’च्या वर्धापन दिन सोहळय़ात कला-संस्कृतीचे दर्शन, बहारदार गाणी, कर्मचाऱयांचे सत्कार

‘प्रबोधन’ गोरेगाव संस्थेचा 52वा वर्धापन दिन सोहळा गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मोठय़ा उत्साहात पार पडला. या वेळी बहारदार हिंदी, मराठी गाण्यांच्या कार्यक्रम सादर झाला. ‘प्रबोधन गोरेगाव’ संचलित मीनाताई ठाकरे रक्तपेढीतील डॉक्टर-तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी कौतुक केले आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला.

गोरगाव पश्चिम, सिद्धार्थ नगर येथील प्रबोधन क्रीडा संकुलात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रसाद महाडकर यांच्या संकल्पनेतून ‘सूर तेचि छेडीता’ हा मराठी-हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम ‘जीवनगाणी’च्या टीमने सादर केला. प्रबोधन गोरेगावच्या सभासदांनी आणि मान्यवरांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला. या वेळी संस्थापक सुभाष देसाई, उपाध्यक्ष सतीश वाघ, समीर देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अशी झाली प्रबोधन गोरेगावची स्थापना

1972 साली नव्याने आकार घेणाऱया गोरेगाव या उपनगराला स्वतःचा असा वेगळा चेहरा असावा अशा इच्छेने काही तरुण धडपडत होते. एखादी संस्था स्थापन करून कामाला सुरुवात करण्यास ते तरुण सज्ज झाले. नेमक्या कोणत्या दिशेने काम करावे याबद्दल मार्गदर्शन मिळावं म्हणून गोरेगावकर तरुण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सांगितले की, संस्था स्थापन करून केवळ सांस्कृतिक कार्यक्रम करत राहू नका तर समाजात अनेक गोष्टी दुर्लक्षित राहिल्या आहेत, त्याकडे लक्ष द्या. असं काम करा की जे दुसऱया कोणी केलं नसेल. ज्या कामाकडे कुणी पाहिलंही नसेल. यानुसार बाळासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांप्रमाणे तरुणांनी कामाला सुरुवात केली. 1972मध्ये 16 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी ‘प्रबोधन गोरेगाव’ची स्थापना केली.