हिंदू विवाहासाठी कन्यादान नाही तर सप्तपदी महत्त्वाचा विधी, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्वाळा

हिंदू विवाह संपन्न होण्यासाठी कन्यादान महत्वाचा विधी नाही तर सप्तपदी हा मुख्य विधी आहे, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

आशुतोष यादव या याचिकाकर्त्याने आपल्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्याची पुर्नविचार याचिका दाखल केली होती. यादवने या प्रकरणातील दोन साक्षीदारांना पुन्हा समन्स बजावण्याची विनंती सत्र न्यायालयात दाखल केली होती. सत्र न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर यादवने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्यासमोर सुनावणी झाली. विवाहावेळी पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी तिचे कन्यादान केले होते का नाही? हे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांना बोलाविण्यात यावे, अशी मागणी यादव याने यावेळी केली. त्यावेळी उच्च न्यायालयाने हिंदू विवाहा कायद्यातील कलम 7चा दाखला दिला. ‘हिंदू विवाह संपन्न होण्यासाठी सप्तपदी विधी अनिवार्य आहे. त्यामुळे कन्यादान झाले होते का नाही? हे गैरलागू आहे’, असे न्यायालयाने स्पष्ट करतानाच साक्षीदारांना पुन्हा बोलावण्याची गरज नाही, असे सांगत याचिका फेटाळून लावली.