हाताला काम नाही, संसाराचा गाडा हाकायचा कसा? भारत कोल कंपाऊंडमध्ये काम करणाऱया कामगारांचा आक्रोश

प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही कुर्ला येथील भारत कोल कंपाऊंडमधील तब्बल 35 गाळे जमीनदोस्त करण्यात आले. या गाळ्यांमध्ये उभ्या असलेल्या उद्योग व्यवसायांचा हजारो कामगारांना पोट भरण्यासाठी आधार होता. कुणाच्या घरात एकुलता एक कमावता आहे, तर कुठे 91 वर्षीय आजी झाडू, साफसफाईची कामे करून पोट भरत होती. पण आता हाताला काम देणारा व्यवसायच राहिला नाही, मग संसाराचा गाडा हाकायचा कसा, असा आक्रोश कामगारांनी दैनिक ‘सामना’कडे व्यक्त केला.

मिंधे गटाचे स्थानिक आमदार दिलीप लांडे आणि विकासक पृथ्वी चौहान या दोघांच्या दबावाखाली मुंबई महापालिकेच्या अधिकाऱयांनी सुमारे 10 हजार गोरगरिबांना रोजीरोटी देणारे गाळे अर्ध्या तासात साफ करून टाकले, असा आरोप गाळेमालक आणि कामगारांनी केला आहे.

91 वर्षीय आजीने आता भीक मागायची का?

वय वर्ष 91… परंतु झाडलोट करण्याचे आणि साफसफाईचे काम करून पोट भरावे लागते. पण आता भारत कोल कंपाऊंडमधील गाळेही गेल्यामुळे लखुबाई बाभानिया यांच्यावर भीक मागायची वेळ आली आहे. तर आणखी एक कामगार पारू मकवाना यांच्या पतीचे 2003मध्ये निधन झाले. त्या गारमेंटमध्ये धागा कटींगचे काम करायच्या. त्यांना 10 ते 12 हजार रुपये मिळायचे. पण आता घरकाम करून महिन्याचे 2 ते 3 हजार रुपये मिळतात. इतक्या तुटपुंज्या पैशांवर दिवस काढावे लागत असल्याचे पारू मकवाना यांनी सांगितले. तर 60 वर्षीय लक्ष्मी वेलजी पटेल यांना लहान मुलांची मालीश, त्यांना अंघोळ घालण्याचे काम करून दिवस काढावे लागत आहेत.

तोडक कारवाई वेळी लाठीमार

पोलीस फौजफाटय़ासह आलेल्या पालिका कर्मचाऱयांच्या कारवाईला कामगारांनी तीव्र विरोध केला. त्या वेळी पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे. 1961पासूनची सर्व कागदपत्रे पुराव्यादाखल असतानाही कारवाई करण्यात आली. आता गाळे पुन्हा कधी उभे राहणार, आमच्या हाताला काम कधी मिळणार, असा सवाल कामगारांनी केला आहे.

नवरा गेला, आता पोट भरणारा व्यवसायही गेला

पती गेल्यानंतर घराची जबाबदारी खांद्यावर आली. खेळण्याचे वय होते त्या वयापासून दोन मुले कामाला लागली. गोरेगावमध्ये दोन्ही मुले हेल्पर म्हणून काम करतात. 8 आणि 5 हजार रुपये पगार मिळतो. तर एक मुलगा शिकतोय, सुनिता राठोड सांगत होत्या. सुनिता राठोड या एका छोटय़ाशा जागेत हॉटेल चालवत होत्या. कामगार त्यांच्याकडे जेवायला येत होते. तिथेच त्या राहातही होत्या. पण पालिकेने केलेल्या कारवाईत त्यांची जागाही गेली. त्यामुळे आता दोन मुलांच्या तुटपुंज्या पगारावरच संसाराचा गाडा सुरू आहे. एक पगार घरभाडय़ात जातो आणि बाकीच्या पगारात कसेबसे दिवस ढकलत असल्याचे राठोड यांनी सांगितले. त्यांचा औषधपाण्याचा खर्चही महिन्याला 3 ते 4 हजार रुपये इतका आहे, असे त्या म्हणाल्या.