IPL 2024 : ऋतुराज गायकवाडचा अनोखा विक्रम

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने कोलकाता विरुद्ध विजय संपादित केला. या विजयामध्ये अर्धशतक झळकावत कर्णधार ऋतुराजने महत्वपूर्ण खेळी केली. तसेच या विजयासोबत चेन्नईचा कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडने आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

चेन्नईने घरच्या मैदानावर कोलकाता नाईट राडयर्सचा पराभव केला आणि हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली. कर्णधार ऋतुराजला या हंगामाध्ये लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. कोलकाता विरुद्धाच्या सामन्यात त्याला सूर गवसला आणि ऋतुराजने 9 चौकारांच्या मदतीने 67 धावांची खेळी केली. ऋतुराजची खेळी चेन्नईच्या विजयात महत्त्वाची ठरली आणि 17 व्या षटकामध्ये तीन गड्यांच्या मोबदल्यात चेन्नईने सोप्पा विजय संपादित केला. विशेष म्हणजे कोलकाता विरुद्ध अर्धशतक ठोकणारा ऋतुराज हा आयपीएलमध्ये चेन्नईसाठी पाच वर्षांनी अर्धशतक झळकावणार पहिला कर्णधार ठरला आहे.

महेंद्र सिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असताना 2019 मध्ये अर्धशतक झळकावले होते. 2022 मध्ये धोनीने अर्धशतकीय पारी खेळली होती. मात्र तेव्हा चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजा होता. त्यानंतर मात्र कोणत्याच कर्णधाराला अर्धशतक झळकावता आले नव्हते. मात्र ही परंपरा ऋतुराज गायकावडने मोडीत काढली आणि तब्बल पाच वर्षांनी चेन्नईला अर्धशतक झळकावणारा कर्णधार मिळाला अस म्हणाव लागेल.