Lok Sabha Election 2024 – प्रचारासाठी काय पण! चपलांचा हार गळ्यात घालून ‘या’ उमेदवाराने केली प्रचाराला सुरुवात

मोठमोठे राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासने दिली जात आहेत. या लढाईत अपक्ष उमेदवार सुद्धा आपलं नाण खणखणीत असल्याचे दाखवत जोरदार प्रचार करत आहेत. प्रचार करण्याच्या हटके पद्धतीमुळे अलिगढ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

अलीगढ लोकसभेच्या जागेवर 14 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. या 14 उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून पंडित केशव देव गौतम यांचा सुद्धा समावेश आहे. इतर मोठ्या राजकीय पक्षांना टक्कर देण्यासाठी पंडित केशव देव गौतम यांनी कंबर कसली असून चपलांचा हार गळ्यात घालत प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. अपक्ष लढत असल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना चप्पल हे निवडणुकीचे चिन्ह दिले आहे. त्यामुळेच पंडित केशव देव गौतम यांनी चपलांचा हार गळ्यात घालूनच प्रचार करायला सुरुवात केली. प्रचार करण्याच्या हटके पद्धतीमुळे त्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.