शोभायात्रांनी मुंबापुरी दुमदुमणार

हिंदू नववर्ष असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत स्वागत यात्रांबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना प्रतिष्ठान मुंबईच्यावतीने गिरगावमध्ये स्वागत सोहळ्याचे तर ताडदेवमध्ये जय भवानी प्रतिष्ठानच्या सहकार्याने नाना चौकात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने स्वागतयात्रा काढली जाणार आहे.

गिरगावच्या स्वागत सोहळ्यात 22 फुटी तिरुपती बालाजी

शिवसेवा प्रतिष्ठानच्यावतीने उद्या गिरगाव नाका, सेंट्रल प्लाझा, येथे गुढी पूजन करून गिरगाव नाका येथे स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वागतयात्रेत महिला बाईकस्वार पांरपारिक वेशात सहिभागी होणार आहेत. गिरगावच्या महाराजाची सुबक गणेशमूर्ती आणि तिरुपती बालाजीची 22 फुटी मूर्ती आकर्षण असणार आहे. यात्रेमध्ये अखंड भारत, हिंदू-मुस्लीम, ईसाई असासुद्धा देखावा तयार करण्यात आला आहे. पारंपरिक लेझीम व दांटपट्टाचे सादरीकरण तसेच महिला ध्वजपथकाचे खास आकर्षण आहे. मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देणारा चित्ररथ आहे. दरम्यान, मुंबईकरांनीही या स्वागतयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर यांच्यासह दक्षिण मुंबईतील नेते, पदाधिकारी, गिरगावकर सहभागी होणार आहेत.

वरळीत भव्य शोभायात्रा आदित्य ठाकरे राहणार उपस्थित

हिंदू नववर्षाची सुरुवात असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. गुढीपाडव्याचे औचित्य साधून शिव शिवसह्याद्री फाऊंडेशनतर्फे उद्या, वरळीत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता जांबोरी मैदान येथून या शोभायात्रेला सुरुवात होणार असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शोभायात्रेत रामरथ असणार आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळय़ाची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. मंगळागौर, साई पालखी, वारकरी भजन, दांडपट्टासारख्या ऐतिहासिक खेळाचे प्रात्यक्षिक, 60 महिलांचे लेझीम पथक हेदेखील शोभायात्रेचे आकर्षण आहे. तसेच सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अंध विद्यार्थ्यांकडून मतदानाविषयी जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संजय शंकर कदम आणि सचिव महेश खवणेकर यांनी दिली.