Surya Grahan 2024 -सूर्यग्रहणाचे क्षण आदित्य एल 1 टिपू शकणार नाही; इस्रोने सांगितले कारण…

इस्रोने सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवलेले आदित्य एल-1 अंतराळयान आज अमेरिकेत दिसणारे पूर्ण सूर्यग्रहण टीपू शकणार नाही. हे ग्रहण उत्तर अमेरिकेच्या बहुतांश भागात दिसणार आहे. हे खग्रास सूर्यग्रहण एक दुर्लभ घटना असून ज्याला पाहण्यासाठी स्कायडायविंगपासून वेगवेगळे योजना आखल्या आहेत.

जवळजवळ शतकानंतर पहिल्यांदाच न्यूयॉर्कच्या पश्चिम आणि उत्तर भागांमध्ये खग्रास ग्रहण पाहायला मिळणार आहे. याबाबत नासाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी खग्रास सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, मॅक्सिको, संयुक्त राज्य अमेरिका आणि कॅनडाहून जाईल. खग्रास सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र सूर्य आणि सूर्याच्या मध्ये जातो तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते. नासा आज या दुर्लभ क्षणाचे संशोधनाबरोबरच ग्रहणाचा मागोवा घेण्यासाठी विशेष विमानही उडवणार आहेत. ही खग्रास घटना अनेक तास चालेल. खग्रास ग्रहणादरम्यान 4 मिनीटांसाठी अंधार पसरणार आहे, तर हिंदुस्थानचे आदित्य एल1 उपग्रह या घटनेचा साक्षीदार होऊ शकणार नाही. याचे कारण म्हणजे इस्रोने आदित्य एल-1 उपग्रह अशा ठिकाणी सोडला आहे जिथून वर्षभर 24×7 सूर्य दिसतो. हिंदुस्थानच्या शास्त्रज्ञांनी अशी जागा निवडली होती जेणेकरून ग्रहणामुळे देखील उपग्रहाच्या दृश्यात अडथळा येऊ नये. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी याला दुजोरा दिला आहे.

हिंदुस्थानच्या आदित्य एल1 चे वजन सुमारे 1,500 किलोग्रॅम आहे आणि हा एक वैज्ञानिक रोबोटिक उपग्रह आहे जो सूर्यावर सतत लक्ष ठेवतो. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘इस्रो’ने आखलेली ही मोहीम ऐतिहासिक आहे. ही सौर वेधशाळा 400 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आली आहे.