धक्कादायक! दिल्ली विमानतळ अणुबॉम्बने उडविण्याची धमकी देणाऱ्या दोन प्रवाशांना अटक

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला अणुबॉम्बने उडविण्याची धमकी देणाऱ्या दोन प्रवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, 5 एप्रिल रोजी अकासा एअर कंपनीच्या दिल्लीहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानात बोर्डिंग पूर्वी ही घटना घडली आहे. indira gandhi international airport वर बोर्डिंगपूर्वी प्रवाशांची स्क्रिनिंग होत होती. याच दरम्यान दोन प्रवाशांनी स्क्रिनिंग करणाऱ्या सुरक्षा जवानांना विमानतळ अणूबॉम्बने उडविण्याची धमकी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी प्रवाशांना अटक करण्यात आले आहे. आरोपींविरोधात विमानतळ पोलीस स्थानकात 182, 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी मिळाल्यानंतर पोलीस सतर्क झाले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातले गजबजलेल्या विमानतळांपैकी एक आहे.

याआधी फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विमानतळाला ब़ॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी अज्ञाताने फोनवर धमकी दिली होती. पोलिसांनी त्याचा तपास केल्यानंतर ती धमकी अफवा असल्याचे कळले. अज्ञाताने दिल्लीहून कोलकात्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती.