मोदींकडून लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू आहे, सोनिया गांधी यांचा हल्ला

देशापेक्षा कोणीही मोठा असूच शकत नाही, पण मोदी स्वतःला महान समजतात. त्यांच्याकडून या देशातील लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू आहे. ते लोकशाही नियमाचे उल्लंघन करत आहेत आणि संपूर्ण व्यवस्थेत भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. ही एक प्रकारची हुकूमशाही आहे. हा देश काही मोजक्या लोकांची जहांगिरी नाही, अशा शब्दांत कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला ठणकावले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या जयपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पेंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, आपल्या पूर्वजांनी कठोर संघर्षाच्या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र, इतक्या वर्षांनंतर आता सर्वत्र अन्यायाचा अंधार पसरला आहे. याविरुद्ध लढून न्यायाचा दिवा पेटवण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे. देशापेक्षा कोणी मोठा असू शकतो का? जो असा विचार करेल त्याला देशातील जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावून भाजपमध्ये घेतले जाते. आज आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. कष्टाने उभारलेल्या लोकशाही संस्था राजकीय हस्तक्षेपामुळे उद्ध्वस्त होत आहेत. आपली राज्यघटना बदलण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. या हुकूमशाहीला आपण  उत्तर देऊ, असे सोनिया गांधी म्हणाल्या. गेल्या 10 वर्षांपासून आपला देश अशा सरकारच्या ताब्यात आहे, ज्याने महागाई आणि बेरोजगारीशिवाय काहीही दिले नाही. हा काळ निराशेचा आहे, पण निराशेसोबतच नवी आशाही जन्माला येते हे लक्षात घ्या, असे सांगत सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला धडा शिकवा, असे आवाहन केले.

मोदी खोटय़ाचे धनी – खरगे

काँग्रेसच्या लोकांनी काळा पैसा गोळा केलाय. तो घेऊन आम्ही प्रत्येकाला 15 लाख रुपये देऊ, असे मोदी म्हणाले होते, पण त्यांनी तो दिला नाही. मोदी खोटय़ाचे धनी आहेत. ते इतकं खोटं कसं बोलतात हेच मला कळत नाही, असा टोला कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यानी लगावला. लोकशाही आणि देशाचे संविधान वाचवण्यासाठी लढा सुरू आहे. जोपर्यंत संविधान सुरक्षित नाही तोपर्यंत कुणालाही काही मिळणार नाही. या लढय़ासाठी आम्हाला तुमच्या ताकदीची गरज आहे, असे आवाहनही खरगे यांनी केले.