‘स्वच्छ श्रीरामपूर, सुंदर श्रीरामपूर’चा उडाला बोजावरा; साचलेला कचरा, तुंबलेल्या गटारी, अस्वच्छता अन् डासांचा प्रादुर्भाव…

श्रीरामपूर शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा, तुंबलेल्या गटारी, अस्वच्छता, डासांचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे श्रीरामपूरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागात तक्रारी करूनही संबंधित अधिकारी-कर्मचारी नागरिकांना जुमानत नसल्याचे दिसत आहे. पालिका प्रशासन व आरोग्य विभागातील अकार्यक्षम कारभाराविरुद्ध शहरवासी आक्रमक होऊ लागले आहेत.

दरम्यान, नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या घरात शिरत असलेले गटाराचे घाण पाणी टँकरमध्ये भरून नगरपालिकेत सोडणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. गटाराच्या घाण पाण्यामुळे शहरात रोगराई पसरल्यास नगरपालिका प्रशासनालाच जबाबदार धरण्यात यावे, असे समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ‘स्वच्छ श्रीरामपूर सुंदर श्रीरामपूर’चे तीन-तेरा वाजले असल्याचे दिसून येत आहे. वॉर्ड क्र.2मधील वैदूवाडा परिसरातील पाटाच्या पुलाजवळील काही घरांमध्ये चक्क गटाराचे घाण पाणी शिरले आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात प्रार्थनेसाठी घराबाहेर पडून मशिदीत जाणे मुश्किल झाले आहे. नगरपालिका प्रशासनाविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कायमच्याच या गंभीर समस्येमुळे काही नागरिक तर आपली घरे सोडून इतरत्र राहावयास जात आहेत. सततच्या या प्रकारामुळे शहरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. या ठिकाणी पाण्यावर मृत्यूला निमंत्रण देऊ पाहणाऱया स्ट्रिट लाईटच्या काही तुटलेल्या अवस्थेतील लोंबकळत्या विजेच्या तारा आणी रस्त्याच्या कडेला गटारीच्या घाण पाण्याने तुडुंब भरलेल्या परिसरातील रस्त्यांसह गटारांचे खोल ढापे यात बुडून एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावर वेळोवेळी तक्रार करूनही कार्यवाही झाली नाही.

गत पाच दिवसांपासून सदरील गटाराचे घाण पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले आहे. त्रस्त नागरिक वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करत आहेत. मात्र, नगरपालिकेचे संबंधित कर्मचारी कधीतरी येऊन थातूरमातूर पद्धतीने कामे करून निघून जातात. शहरातील घनकचरा असो वा गटार साफसफाई याविषयी शहराच्या प्रत्येक प्रभागात अशीच भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे शहरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.