पश्चिमरंग – मागेपुढे बायनरी फॉर्म

>>दुष्यंत पाटील

म्युझिकल फॉर्म्समधील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे बायनरी म्युझिकल फॉर्म. एखाद्या उलगडत जाणाऱया कथेसारखी असते. संगीताच्या भाषेत बोलायचं झालं तर या भागात संगीत रचनेत येणारी थीम ऐकायला मिळते आणि पुढच्या भागात त्यावर आधारीत संगीताचे तुकडे नवनवीन रूपांमध्ये येतात. यामुळे एकाच वेळी संगीत रचनेत विविधतेचा अनुभव येतो.

संगीत रचना करताना संगीतकाराला कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो ते आपण मागं पाहिलंच. एखाद्या संगीत रचनेत एकच थीम पुनः पुन्हा येत असेल, त्यात दुसरं काहीच येत नसेल तर आपण ती रचना ऐकताना नक्कीच कंटाळून जाऊ. याउलट एखाद्या रचनेत येणाऱया थीम्समध्ये खूपच विविधता असेल आणि आपल्याला त्यात काही समान धागाच सापडत नसेल तर आपण गोंधळून जाऊ. एखाद्या लक्ष खेचून ठेवणाऱया संगीत रचनेत एक समान असणारा धागाही असायला हवा आणि त्यात विविधताही असायला हवी, पण संगीतात एकता आणि विविधता आणायची कशी?

कल्पना करा की, एखाद्या रचनेत सुरुवातीला एका पट्टीत एक थीम येते. त्यानंतर संगीत दुसऱया पट्टीत शिरून दुसऱया पट्टीतली थीम सुरू होते. पहिल्या थीमपेक्षा दुसरी थीम वेगळी असल्यानं आणि पट्टीही वेगळी असल्यानं आपल्याला इथं विविधता नक्कीच जाणवेल. अशाच एकामागोमाग एक वेगवेगळ्या पट्टय़ांमध्ये वेगवेगळ्या थीम्स येत राहिल्या तर मात्र त्यात काही एकसमान धागाच उरणार नाही. हे संगीत आपल्याला अगदीच असंबद्ध वाटेल. आपण मागे पाहिल्याप्रमाणे संगीत रचनेत एकता आणि विविधता यांचा समतोल साधण्यासाठी पाश्चात्त्य संगीतकार म्युझिकल फॉर्मचा वापर करतात.

म्युझिकल फॉर्म्सपैकी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे बायनरी म्युझिकल फॉर्म. एखाद्या संगीत रचनेसाठी हा फॉर्म वापरला गेला असेल तर त्या संगीत रचनेचे दोन विभाग करता येतात. पहिल्या विभागाला ‘अ’ तर दुसऱया विभागाला ‘ब’ असं नाव आपण देऊ शकतो. त्यामुळे पूर्ण संगीत रचना आपण ‘अ-ब’ अशा प्रकारे दाखवू शकतो. बायनरी म्युझिकल फॉर्ममध्ये असणाऱया ‘अ’ आणि ‘ब’ या विभागांमध्ये नेमकं काय येतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संगीत रचना एखाद्या उलगडत जाणाऱया कथेसारखी असते. बायनरी फॉर्म असणाऱया संगीत रचनेच्या कथेमध्ये दोन भाग येतात. यातल्या पहिल्या भागात कथेतल्या पात्रांचा परिचय होतो. याच भागात एका प्रकारे कथेची वातावरण निर्मिती होते. संगीताच्या भाषेत बोलायचं झालं तर या भागात संगीत रचनेत येणारी थीम ऐकायला मिळते (किंवा काही वेळेला थीम्स ऐकायला मिळतात). याच भागात संगीत कोणत्या पट्टीमध्ये आहे याची आपल्याला जाणीव होते. एखाद्या विषयावर चर्चा होणार असेल तर चर्चेआधी त्या विषयाचा पूर्णपणे परिचय व्हावा, त्याप्रमाणे संगीत रचनेच्या या भागात रचनेतल्या थीमचा, पट्टीचा परिचय होतो. संगीतरचनेचा ‘अ’ हा भाग आपल्याला एका विशिष्ट मूडमध्ये घेऊन जातो. बहुतेक वेळा पहिला भाग संपताना संगीताची मुख्य पट्टी बदलत जाऊन संगीत दुसऱया पट्टीत आलेलं असतं.

संगीत रचनेच्या पहिल्या भागात जिथं संगीत येतं, तिथूनच दुसऱया म्हणजे ‘ब’ भागातल्या संगीताला सुरुवात होते. संगीत रचनेला कथा मानलं तर पहिल्या भागात सुरू झालेल्या कथेमध्ये दुसऱया भागात बरेचसे ‘ट्विस्ट्स’ येतात. पहिल्या भागात आलेले संगीतातले तुकडे दुसऱया भागात नवनवीन रूपात येतात. काही वेळेला दुसऱया भागात नवीन थीमही येऊ शकते. पहिल्या भागातलेच संगीताचे तुकडे वापरले गेल्यामुळे संगीत रचनेत एकतेचा अनुभव येतो, तर दुसऱया भागात आलेले संगीताचे तुकडे नवनवीन रूपांमध्ये असल्यामुळे संगीत रचनेत विविधतेचा अनुभव येतो. पहिला भाग संपताना संगीत मूळच्या पट्टीतून वेगळ्या पट्टीत गेलेलं असतं. दुसरा भाग या वेगळ्या पट्टीत सुरू होतो. दुसरा भाग संपताना मात्र संगीत पुन्हा मूळच्या पट्टीत येतं. बहुतेक वेळा बायनरी फॉर्म असणाऱया रचनांमध्ये ‘अ’ आणि ‘ब’ हे भाग दोनदा येतात. त्यामुळे या प्रकारच्या संगीत रचना आपल्याला ‘अ-अ-ब-ब’ अशा स्वरूपात ऐकायला मिळतात.

संगीताच्या इतिहासात वेगवेगळ्या कालखंडांमध्ये संगीतकारांनी बायनरी म्युझिकल फॉर्मचा वापर केला. काही क्लिष्ट असणाऱया म्युझिकल फॉर्म्समध्येही बायनरी फॉर्मचा कशा प्रकारे वापर केला जातो ते आपण पुढे पाहूच.

बायनरी फॉर्म समजून घेण्यासाठी आपण बाखची `Minuet in G Major’ ही रचना यूटय़ूबवर ऐकू या. अतिशय साध्या आणि कर्णमधुर असणाऱया या रचनेमधला बायनरी फॉर्म आपल्याला लगेचच ओळखता येईल.

[email protected]