उद्योगविश्व – चालतं फिरतं मंगल कार्यालय

>>अश्विन बापट

लातूरच्या दयानंद दरेकरांनी अर्ध्या तासात पोर्टेबल मंडपचा सेटअप बनवून नव्या व्यवसायाचा रचला पाया. आता मंगल कार्यालय आलं आहे तुमच्या दारी…

साऊंड सिस्टीम अरेंजमेंट, स्टेज डेकोरेशन, एसी अरेंजमेंट हे सारं एकाच सेटअपमध्ये! तुम्ही म्हणाल, हे मी कुठल्या तरी टेक्नॉलॉजी किंवा व्हीएफएक्स तंत्रज्ञानाबद्दल सांगतोय का? तर याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. पोर्टेबल मंडपाची अर्थात चालत्या फिरत्या मंगल कार्यालयाची ही अनोखी शक्कल लढवलीय लातूरच्या दयानंद दरेकर यांनी. या हटके आयडियाबद्दल दरेकर यांना बोलतं केलं असता ते म्हणाले, मी मूळचा लातूरमधील निलंगा तालुक्यातल्या राठोडा गावचा. आयटीआय मोल्डरचं ज्ञान अवगत असल्याचा फायदा मला या पोर्टेबल मंडप व्यवसायात झाला. रिक्षा चालवणे, वडापावची गाडी चालवणे अशा गोष्टी केल्यानंतर मंडप डेकोरेशन व्यवसाय मी सुरू केला. 2006 ते 2016 या काळात हा व्यवसाय चांगला सुरू होता. काळानुरूप वाढती स्पर्धा, वाढता उत्पादन खर्च पाहता तो चालवणं कठीण झालं. काळानुरूप या मंडप व्यवसायाला मजूर मिळणं हे त्यातलं प्रमुख आव्हान होतं, ज्याला मला दररोज तोंड द्यावं लागत होतं. त्यात भर म्हणजे मंडप साकारायला लागणारा दोन ते चार दिवसांचा वेळ. हे सारं लक्षात घेता लेबर चार्जेस दिवसेंदिवस वाढत जात होते. हाच मुख्य मुद्दा, ज्याने पोर्टेबल मंडप कल्पनेला जन्म दिला. सुरुवातीला मी ही कल्पना मांडली, तेव्हा लोकांनी मला वेडय़ात काढलं. मी मात्र निर्धाराने 2016 पासून या व्यवसायाची बांधणी सुरू केली. होमवर्क करून, कामाची नीट आखणी केली. अशी सगळी पूर्वतयारी केली. मग माझं अंदाजे 3 ते 4 कोटींचं मंडप साहित्य विकून या नव्या कल्पनेला साकारण्यासाठी पाऊल टाकलं.

अल्को पॅनल अर्थात प्रामुख्याने अॅल्युमिनियमपासून हा पोर्टेबल मंडप मी साकारला. ज्याला फोल्ड केलं की, साडेआठ फूट रुंदी आणि 40 फूट लांबी अशी साईज होते. तो पूर्ण उभारला की, 30 फूट बाय 40 फूट होतो. एका वेळी या पोर्टेबल मंगल कार्यालयात अंदाजे 175 लोक खुर्चीवर किंवा 300 जण हिंदुस्थानी बैठकीवर बसू शकतात. त्याची ने-आण करून तो उभारण्यासाठी फक्त दोन मजुरांची गरज लागते. अवघ्या अर्ध्या तासात हा मंडप उभारून होतो. तसंच कार्यक्रम पार पडल्यावर तो तितक्याच वेळात पुन्हा फोल्ड करून परतही आणला जातो.

सध्या लातूर जिह्यात मी भाडेतत्त्वावर हा मंडप ग्राहकांना गरजेनुसार उपलब्ध करून देत असतो. याचं दैनिक भाडं मी आकारतो. 2021 ला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत मी अंदाजे 50 सोहळे या मंडपामध्ये केलेत. अलीकडेच ‘भारत जोडो’ यात्रेकरतादेखील हा मंडप सेटअप मी पाठवला होता. पोर्टेबल मंडपाची ही कल्पना खूपच वेगळी असल्याने आणि त्याचं फंक्शनिंग खूपच स्मूथ असल्याने विविध जिह्यांमधून मला खूप मागणी आहे. तुमच्या घराजवळ किंवा तुम्हाला हवं त्या ठिकाणी हा मंडपाचा सेटअप मिळत असेल तर लोकांना ते हवंच आहे. त्यामध्ये स्टेज डेकोरेशन, साऊंड सिस्टीम सेटअप, लाईट्स, असं सगळं एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने हे पॅकेज लोकांच्या पसंतीला उतरलंय. फक्त सेटअप एकच असल्याने त्याचा पुरवठा करण्यावर मर्यादा येतायत.

मला व्यवसाय वृद्धी करायचीय. यादृष्टीने उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याशी माझी एक मीटिंगही झाली, पण पावलं पुढे काही पडली नाहीत. खरं तर हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. एका जिह्यात 25 असे एकूण 900 सेटअप करण्याचं प्लॅनिंग आहे. हे प्रोजेक्ट जर मूर्तरूपात आलं तर, अंदाजे 25 हजार लोकांसाठी रोजगार निर्मिती होऊ शकते. महिंद्रांसोबत हे प्रोजेक्ट पुढे जावं अशी माझी फार इच्छा आहे. येत्या वर्षामध्ये काहीतरी चांगलं वर्क आऊट व्हावं, असं माझं स्वप्न आहे.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर – सीनियर न्यूज अँकर आहेत.)