पाऊलखुणा- कालिदास आणि छत्तीसगड

>> आशुतोष बापट

आषाढस्य प्रथमदिवसे…हे शब्द वाचले की, आठवण होते ती महाकवी कालिदास आणि त्याच्या मेघदूत या काव्याची. अंदाजे एक हजार वर्षांपूर्वीचा हा कवी, नाटककार, साहित्यकार. एकाहून एक सरस संस्कृत साहित्याची निर्मिती करणारा महाकवी. कुमारसंभव, अभिज्ञानशाकुंतल, विक्रमोर्वशीय, रघुवंश अशा अप्रतिम कलाकृतींचा निर्माता कालिदास अजरामर झाला तो त्याच्या ‘मेघदूत’ या काव्यामुळे. छत्तीसगडचे सिमला म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण कालिदासाच्या रामगढजवळच वसलेले आहे. त्या ठिकाणाचा घेतलेला हा धांडोळा.

कालिदास आणि मेघदूत हे एक अतूट नाते निर्माण झालेले आहे. एकांतात जीवन व्यतीत करणारा शापित यक्ष आकाशातील मेघाद्वारे आपल्या प्रिय पत्नीला आपली खुशाली कळवतो आहे असा सरळसोपा विषय, पण कालिदासाने तो एका अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवला आहे. मेघदूताची भुरळ अनेकांना विविध पद्धतीने पडली. कुणी त्यातल्या स्थळांचे वर्णन करतात, तर कुणी त्यातील अलंकार शोधतात. कुणी मेघदूतात वर्णन केलेल्या ठिकाणांचा विमानातून शोध घेतात, तर कुणी मेघदूताद्वारे कालिदासाचे अंतरंग शोधण्याचा प्रयत्न करतात. एक ना अनेक विषय या एका महाकाव्याने अभ्यासकांना उपलब्ध करून दिले आहेत.

कालिदासाच्या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेताना आपोआप चर्चा होते ती रामगिरी पर्वत, रामटेक, नागपूर या सगळय़ा गोष्टींची. काही अभ्यासक कालिदासाचा काळ शोधण्यात मग्न होतात. मग राजा चंद्रगुप्त विक्रमादित्य, त्याची मुलगी प्रभावती गुप्त आणि तिचा विवाह झालेला वाकाटक नृपती रुद्रसेन असा सगळा इतिहास आपल्यासमोर मांडतात. प्रभावतीच्या माहेराहून तिच्यासोबत आलेला कालिदास, त्याचा रामटेक इथला मुक्काम हे सगळे ओघाने येते आणि मग त्या कालिदासाने मेघदूत हे काव्य नागपूरजवळील याच रामटेक इथे लिहिले अशी धारणा निर्माण होते. अनेक विद्वानांनीसुद्धा याच गोष्टीला मान्यता दिलेली आहे. हे सगळे सविस्तर सांगायचे कारण असे की, कालिदासाचा संबंध जसा महाराष्ट्रातील रामटेकशी जोडला आहे, तसाच त्याचा संबंध छत्तीसगडमधील एका ठिकाणाशी जोडला गेला आहे. छत्तीसगडची मंडळी मेघदूताचे अधिकृत जन्मस्थान हे छत्तीसगडच असल्याचा दावा करतात. नुसती प्रजाच नव्हे तर छत्तीसगड सरकारसुद्धा असेच समजत आलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी हे ठिकाण मेघदूताची कर्मभूमी म्हणून खास करून विकसित केलेले आहे. त्या ठिकाणाचा घेतलेला हा धांडोळा.

छत्तीसगड हा निसर्गसंपन्न प्रदेश आहे. तितकाच तो ऐतिहासिक आणि वारसा स्थळांनीसुद्धा समृद्ध आहे. छत्तीसगडचा एक जिल्हा आहे सरगुजा. या सरगुजा जिह्यात अंबिकापुर हे गाव आणि त्याजवळ मैनपाट हे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. या अंबिकापुरपासून सुमारे 45 कि.मी. अंतरावर रामगढ नावाचा डोंगर आहे. या डोंगरात ‘सीताबेंगरा आणि जोगीमारा’ या सुप्रसिद्ध लेणी आहेत. या लेणींमध्ये ब्राह्मी लिपीत कोरलेला शिलालेख आहे. तसेच जोगीमारा लेणीत गुहाचित्रे बघायला मिळतात. या लेणी ज्या रामगढ नावाच्या डोंगरात खोदलेल्या आहेत तोच रामगढ म्हणजे कालिदासाने मेघदूत लिहिल्याचे ठिकाण आहे अशी छत्तीसगडच्या मंडळींची ठाम समजूत आहे. त्यासाठी कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओळी आणि ते वर्णन रामगढशी कसे मिळतेजुळते आहे याचा दाखला आवर्जून दिलेला आहे.

रामगढ परिसर अतिशय रमणीय आहे. इथे रामगढ नावाचा डोंगर आहे. यालाच पूर्वी रामगिरी म्हणत असत. याच रामगढ डोंगरात सीताबेंगरा आणि जोगीमारा लेणी आहेत. कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेला रामगिरी तो हाच असल्याचे छत्तीसगडच्या लोकांचे म्हणणे आहे. मेघदूतात रामगिरीचे केलेले वर्णन या ठिकाणाला चपखल बसते. त्या महाकाव्यात वर्णन केल्यानुसार या रामगिरी पर्वतातसुद्धा लेणी आहेत. त्यामुळे मेघदूताचे जन्मस्थान हेच असल्याचे इथले लोक समजतात आणि म्हणूनच या सगळय़ा परिसराला ते कालिदासाची ‘रचनास्थली’ म्हणून गौरवतात. छत्तीसगडच्या सरकारने तिथे एक सुंदर कालिदास स्मारक तयार केले आहे. एका मोठय़ा मैदानावर काही पायऱया आणि त्याच्या मागे एक भिंत असून त्यावर कालिदासाचा यक्ष, आकाशातला मेघ यांचे मोठे चित्र काढलेले आहे. तसेच त्या चित्राच्या दोन्ही बाजूंना मेघदूतातील ओळी लिहिल्या आहेत. त्याच्यावर ‘महाकवी कालिदास की रचनास्थली’ असे लिहिले आहे. मुख्य रस्त्यावरून इथे जायचा जो फाटा लागतो, तिथे एक मोठी कमान उभारली आहे. त्याच्या शेजारी कविकुलगुरू कालिदासाचा पुतळा बसवला आहे. त्याच्यावरती मंडप बांधला आहे. त्याच्या बाजूंना असलेल्या भिंतींवर कालिदासाच्या मेघदूतातील ओळी कोरलेल्या आहेत. एक सुंदर म्युरल इथे केलेले दिसते. रमणीय छत्तीसगड प्रदेशी हिंडताना कवी कुलगुरू कालिदास असा अकस्मात समोर येतो आणि त्याचे ते रमणीय स्मारकजवळच असलेल्या सीताबेंगरा-जोगीमारा लेणी व तो सुप्रसिद्ध रामगढ मनात घर करून राहतो. इतिहास किंवा अभ्यासकांचे मत काही असले तरी एखादे ठिकाण विकसित कसे करायचे याचा हा आदर्श वस्तुपाठ छत्तीसगड सरकारने घालून दिलेला दिसतो. एखाद्या व्यक्तीचा, ठिकाणाचा किंवा ऐतिहासिक घटनेचा नुसता पोकळ अभिमान न बाळगता त्याचे उचित दृश्य स्मारक केलेले इथे दिसते.

इतका सुंदर प्रदेश, तिथली नीरव शांतता, चहूबाजूला असलेली गर्द झाडी हे सगळे घटक सुंदर असे महाकाव्य सुचायला अगदी पोषक आहेत. त्यामुळे कालिदास इथेच वास्तव्याला असावा आणि बहुतेक त्याने मेघदूताची निर्मिती इथेच केली असावी असे आपल्यालासुद्धा वाटायला लागते. हे सगळे समजून घेण्यासाठी किंवा इथल्या या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी छत्तीसगडमधल्या रामगढ परिसराला भेट द्यायला हवी.