IPL 2024 – घरच्या मैदानावर हैदराबादच किंग, चेन्नईचा सलग दुसरा पराभव

अभिषेक शर्मा (12 चेंडू 37 धावा) आणि ट्रेविस हेड (24 चेंडू 31) धावा यांनी हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. एडन मार्करमने (36 चेंडू 50 धावा) आक्रमक खेळ करत हैदराबादला विजयाच्या जवळ आणले आणि नितीश रेड्डीने (8 चेंंडू 14 धावा) षटकार खेचत विजयावर शिक्का मोर्तब केला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर पार पडलेल्या सामन्यात 166 धावांचा यशस्वी पाठलाग करत सनरायजर्स हैदराबादने मुंबई पाठोपाठ चेन्नईला सुद्धा धुळ चारली.

आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सलग दुसरा सामना घरच्या मैदानावर खेळणाऱ्या हैदराबादने विजयी परंपरा कायम ठेवत मुंबई पाठोपाठ चेन्नईचा सुद्धा पराभव केला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी कर्णधार पॅट कमिंन्सने घेतलेला निर्णय योग्य ठरवत चेन्नईच्या फलदाजांना झकडून ठेवले. चेन्नईची सुरुवात खराब झाली. रचिनच्या (9 चेंडू 12 धावा) स्वरुपात चेन्नईला पहिला हादरा 25 या धावसंख्येवर बसला त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केले. ऋतुराज गायकवाड 3 चौकार आणि 1 षटकार ठोकत 26 या धावसंख्येवर स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणे (30 चेंडू 35 धावा), शिवम दुबे (24 चेंडू 45 धावा), जडेजा (23 चेंडू 31 धावा) आणि मिचेल (11 चेंडू 13 धावा) यांना हैदराबादच्या गोलदाजांनी झकडून ठेवत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. भुवनेश्वर, नटराजन, कमिंन्स, शाहबाज अहमद आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.