Lok Sabha Election 2024 : बीडमध्ये जे घडलं तेच मध्य प्रदेशातही घडलं? समाजवादी पार्टीच्या उमेदवाराचा अर्ज बाद

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू आहे. असे असतानाच काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे त्यांचा उमेदावारी अर्ज बाद करण्यात आला. आता जवळपास असाच काहिसा प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

खजुराहो लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पार्टीच्या उमेदवार मीरा यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. भाजप खुलेआम लोकशाहीची हत्या करत आहे, असे म्हणत अखिलेश यादव यांनी जोरदार हल्ला चढवला. अखिलेश यादव यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला. “खजुराहो मतदारसंघातून ‘इंडिया’ आघाडीच्या सपा उमेदवार मीरा यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करणे ही लोकशाहीची निर्घृण हत्या आहे. स्वाक्षरी नव्हती असे सांगितले जात आहे. मग फॉर्म बघणाऱ्या अधिकाऱ्याने फॉर्म घेतलाच का? हे सर्व बहाणे असून पराभूत भाजपची निराशा आहे. न्यायालयाच्या कॅमेऱ्या समोर जे फसवणूक करू शकतात ते फॉर्म मिळाल्यावर पाठीमागे काय-काय करत असतील,” असा घणाघात अखिलेश यादव यांना केला आहे. भाजपचा दुटप्पी चेहरा उघडा पाडल्याचेही ते म्हणाले.

“भाजप केवळ बोलण्यातचं नाही तर कृतीतही खोटा आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा भ्रष्ट करण्यातही भाजप दोषी आहे,” असे म्हणत भाजपच्या भ्रष्ट राजकारणावर त्यांनी टीका केली.

“या घटनेचीही न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, कोणाचाही उमेदवारी अर्ज रद्द करणे हा लोकशाही दृष्टीने गुन्हा आहे,” असे म्हणत अखिलेश यादव न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.