स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, चार परदेशी तरुणींसह सातजणींची कोरेगाव पार्कमधून सुटका

स्पा सेंटरच्या नावाखाली कोरेगाव पार्क परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. येथील ‘एल स्पा’ सेंटरवर छापा टाकून कारवाई करत 7 तरुणींची सुटका केली. तर, दोघांना अटक केली. सुटका केलेल्या तरुणीत थायलंड देशातील चार आणि मिझोराम, छत्तीसगड राज्यातील तीन तरुणींचा समावेश आहे.

स्पा मालक सुरेंद्र जगन्नाथ पाटील (वय 32, रा. सुखवानी रॉयल सोसायटी, विमाननगर), मॅनेजर शाहरुख अहमद चौधरी (वय 27, रा. जाधवनगर, मुंढवा, मूळ रा. आसाम) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोरेगाव पार्कमधील ज्वेल स्क्वेअर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ‘एला स्पा’ आहे. यामध्ये देशासह परदेशी तरुणीकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर बनावट ग्राहक पाठविण्यात आला. ग्राहकाने याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये थायलंडच्या चार तरुणींचा समावेश आहे. तर, मिझोरामच्या दोन तरुणी आणि छत्तीसगडच्या एका तरुणीसह एकूण सातजणींची सुटका करण्यात आली. या कारवाईत 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.