एकवेळ विषारी सापावर विश्वास ठेवा, पण भाजपवर नको

एकवेळ तुम्ही विषारी सापावर विश्वास ठेवा, पण भाजपवर कधीही ठेवू नका. भाजपने देशाचा नाश चालवला आहे, अशा तिखट शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी येथे भाजपची धुलाई केली.

कूचबिहारमध्ये आयोजित एका सभेत त्यांनी भाजपवर आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केल्याचा आरोप केला. केंद्रीय तपास यंत्रणा, सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सारे भाजपच्या इशाऱयावर काम करत आहेत, असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाकडे सर्व राजकीय पक्षांना समान संधी आणि वागणूक देण्याची मागणी केली.

कूचबिहारमधून भाजपचे निशिथ प्रामाणिक पुन्हा निवडणूक लढवत आहेत. ज्यांच्यावर अनेक खटले प्रलंबित आहेत, अशा व्यक्तीची गृहराज्यमंत्रीपदी नियुक्ती होणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका त्यांनी निशिथ यांचे नाव न घेता केली.

ईव्हीएमचे संरक्षण करण्याचे आवाहन

केंद्रीय तपास यंत्रणा, एनआयए, आयटी, बीएसएफ आणि सीआयएसएफसारखी केंद्रीय दले भाजपसाठी काम करत आहेत. अशा वेळी निकाल जाहीर होईपर्यंत जनतेनेच ईव्हीएमचे संरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी आणखी एका सभेत केले.

आम्ही झुकणार नाही

केंद्रीय एजन्सीच्या दडपण, धमक्यांपुढे तृणमूल काँग्रेस कदापि झुकणार नाही, असे त्या म्हणाल्या. 19 एप्रिलच्या मतदानापूर्वी बीएसएफकडून स्थानिक लोकांवर अत्याचाराच्या घटना घडल्यास पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.