शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही; कोल्हापुरातील सर्वपक्षीय शेतकरी मोर्चा काढणार

‘राजर्षी शाहूंचे शेती धोरण हवे; सरकारचे शेती धोरण नको’, असा नारा देत कोणत्याही प्रकारची तडजोड न करता शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही, असा निर्धार करत शक्तिपीठ महामार्गाविरोधात सर्वपक्षीय शेतकऱयांनी वज्रमूठ आवळली आहे.

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज राजर्षी शाहू स्मारक भवन येथे ‘शेतकरी निर्धार मेळावा’ संपन्न झाला. हा लढा केवळ शेतकऱयांचा नव्हे; तर नागरिकांचादेखील आहे. त्यामुळे सर्वांना संघटित करून संघर्ष तीव्र करण्याच्या निर्णय घेण्यात आला.

राजू शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱयांवर संकट कोसळणार आहे. समृद्धी महामार्ग कामात कंत्राटदारांकडून मागीलवेळी पैसे घेऊन आमदार फोडण्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये वापरले. त्याप्रमाणे आता शक्तिपीठ महामार्गाच्या कमिशनमधून सरकार लोकसभा निवडणुकीत आमदार, खासदार फोडेल, अशी टीका त्यांनी केली.

सतेज पाटील म्हणाले, राज्यात अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्याबाबत निर्णय होत नाही. मात्र, शक्तिपीठ महामार्गाचा निर्णय घेण्यासाठी सरकारने तत्परता दाखवली. जनतेच्या खिशातून टोलवसुली आणि कमिशन यासाठीच सरकारने शक्तिपीठ महामार्ग आणला आहे. यातून केवळ कंत्राटदार लॉबीचे भले होणार आहे. कोणीतरी मोबदला देतो म्हटल्यास शेतकऱयांनी त्याला बळी न पडता एकजुटीने जमीन न देण्याची शपथ घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

कोल्हापूरकरांनी आंदोलनाचे नेतृत्व केल्यास समृद्धी महामार्ग रद्द होईल, असे अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष ऍड. हिरालाल परदेशी यांनी सांगितले.

यावेळी समन्वयक गिरीश फोंडे, भारत पाटणकर, माजी आमदार संजय घाटगे, अनिल चव्हाण, प्रकाश पाटील, नामदेव पाटील, संपत पवार-पाटील, महादेव धनवडे, विक्रांत पाटील, मच्छिंद्र मुगडे, सुधाकर पाटील, भगवान पाटील आदी उपस्थित होते.

आंदोलनाची पुढील दिशा

z शक्तिपीठ महामार्गाविरोधात 5 ते 15 एप्रिल या काळात गावागावांमध्ये दोन लाख सह्या संकलित करून शासनाला पाठवणार. z दि. 15 ते 30 एप्रिल स्थानिक आमदारांना शक्तिपीठ महामार्गाविरोधात निवेदन देऊन भूमिका जाहीर करण्याचा आग्रह करणार. z महामार्गाविरोधात गावागावात ग्रामसभेचे ठराव करणार. z दि.10 मे रोजी जिह्याची बैठक बोलावून एक लाख लोकांच्या मोर्चाचे नियोजन.