IPL 2024 : मावी आयपीएलबाहेर, लखनऊला धक्का

आवेश खानची पोकळी भरून काढण्यासाठी शिवम मावीला लखनऊ सुपर जायंट्स संघात घेण्यात आले होते. तब्बल 6.4 कोटींची बोली लावत त्याला संघात घेतले होते. मात्र आता दुखापतीमुळे त्याला एकही सामना न खेळताच संघाबाहेर पडावे लागले आहे. दुखापतीमुळे आयपीएलला सोडावे लागल्यामुळे लखनऊचे संघ व्यवस्थापन आणि खुद्द मावीलाच खूप मोठा धक्का बसला आहे.

लखनऊने शेअर केलेल्या व्हिडीओत शिवम मावी आपल्या दुखापतीबाबत बोलताना म्हणाला, मी सामना खेळेन आणि संघासाठी चांगली कामगिरी करेन असे मला वाटले होते. पण दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही. दुखापतीमुळे मला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. खेळाडूला मानसिकदृष्टय़ा मजबूत असणे आवश्यक आहे आणि पुनर्वसन करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे हेदेखील माहिती असणे आवश्यक आहे.

शिवम एकही सामन्यात उतरू शकला नाही

हिंदुस्थानसाठी सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या मावीला लखनऊने गेल्या लिलावात 6.4 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आवेश खानची पर्यायी व्यवस्था म्हणून मावीकडे पाहिले जात होते. पण हाच खेळाडू  दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही आणि न खेळताच स्पर्धेबाहेर फेकला गेला. मावी संघात नसला तरी लखनऊला त्याचा फारसा फरक पडणार नाही. कारण मॅट हेन्री, शमार जोसेफ आणि मोहसीन खानसारखे जबरदस्त गोलंदाज लखनऊच्या ताफ्यात आहेत