एक मलिक बारा भानगडी; सानियाला सोडले, सनाला पटविले, तरी अय्याशी थांबेना

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक सध्या क्रिकेटपेक्षा त्याच्या लफडयांमुळेच अधिक चर्चेत राहताना दिसतोय. हिंदुस्थानची टेनिससुंदरी सानिया मिर्झासोबतचा संसार मोडून शोएब मलिकने यावर्षी जानेवारीत सना जावेदसोबत नवा संसार थाटला. मात्र, तो आता नवाल सईद या आणखी एका अभिनेत्रीसोबत फ्लार्ंटग करत असल्याचे वृत्त आहे. एवढेच नव्हे तर शोएब मलिक अनेक मुलींसोबत फ्लार्ंटग करत असल्याचीही चर्चा सध्या पाकिस्तानमध्ये सुरू असल्याने त्याला ‘एक मलिक बारा भानगडी’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

शोएब मलिकने पहिल्या बायकोला सोडून सानिया मिर्झाशी निकाह केला होता. सानिया ही हिंदुस्थानची स्टार टेनिसपटू असल्याने क्रीडाजगतात त्यांचे लग्न चांगलेच गाजले होते. मात्र, शोएब मलिकने सानियालाही धोका देत पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत नवा संसार थाटला. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्याने आपले हे नाते सार्वजनिक केले होते. सना ही शोएबची तिसरी पत्नी झाली. सना जावेदशी शोएब मलिक हा एका पाकिस्तानी शो दरम्यान भेटला होता. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. शोएब अन् सानिया यांचा संसार सुरू असतानाच शोएब फक्त सना जावेदसोबत फ्लार्ंटग करत नव्हता तर अनेक मुलींसोबत तो फ्लार्ंटग करत असल्याचे पुढे आले आहे.

पाकिस्तानची नवाल सईद ही 25 वर्षांची अभिनेत्री सध्या खूप चर्चेत आली आहे. ती एका रमजान शो मध्ये पाहुणी म्हणून आली होती. हा तोच शो होता जेथे सना जावेद आणि शोएब मलिक यांची पहिल्यांदा भेट झाली होती. या कार्यक्रमादरम्यान नवाल सईदला विचारण्यात आलं की तुला कोणत्या अभिनेत्याने मेसेज केला होता का? यावर तिनं सांगितलं की मला जास्तीतजास्त मेसेज हे क्रिकेटपटूंचे येतात. देशाचे प्रतिनिधित्व करत असताना असं वागणं बरं नव्हं, असं नवाल म्हणते. त्यानंतर शोच्या होस्टने तिला थेट प्रश्न केला की तुला शोएब मलिक मेसेज करतो का? त्यावर अभिनेत्रीने हसून उत्तर देणं टाळलं. मात्र, आपण क्रिकेटपटूंनी केलेल्या मेसेजचे स्क्रीन शॉट काढलेले आहेत, असे सांगून तिने आपल्याकडे पुरावा असल्याचेही स्पष्ट केले आहे.