मुंबईच्या मदतीसाठी सूर्या येतोय रे…

सलग तीन पराभवांनी खचलेल्या मुंबई इंडियन्ससाठी गूड न्यूज समोर आलीय. त्यांच्या मदतीला आता चक्क सूर्यकुमार यादव संघात परत येतोय. गेले काही दिवस फिटनेससाठी झगडत असलेला सूर्यकुमार यादव अखेर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) फिटनेस चाचणीत पास झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या पडलेल्या चेहऱयावर आनंदाची लकेर उमटली असून येत्या रविवारी होणाऱया दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्या फलंदाजीचा झंझावात मुंबईकरांना पाहायला मिळू शकतो.

आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी संघात सूर्यकुमार खेळावा म्हणून बीसीसीआयला कोणताही धोका घ्यायचा नव्हता. त्याचमुळे त्यांनी सूर्यकुमारला फिटनेसचे प्रमाणपत्र दिले नव्हते. सूर्याच्या अनुपस्थितीचा मुंबईला फार मोठा धक्का बसला आहे. गेल्या तिन्ही सामन्यांत मुंबईला पराभवाची झळ सोसावी लागली होती. गेले तीन महिने सूर्या दुखापतीमुळे संघाबाहेरच होता. आधी पायाची दुखापत आणि त्यानंतर स्पोर्टस् हर्नियावरील शस्त्रक्रियेमुळे सूर्याचा विश्रांतीचा काळ वाढला होता. आता आयपीएल खेळण्यासाठी सूर्याला हिरवा पंदील मिळाला आहे आणि तो 5 एप्रिलला मुंबई संघात सरावासाठी दाखल होईल, असे सूत्रांकडून कळतेय. आता सूर्याला आपल्या बॅटचा तडाखा गोलंदाजांना दाखवत आपण टी-20 वर्ल्ड कपसाठीही हिट आणि फिट असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. आयपीएलमधील कामगिरीच सर्व खेळाडूंचे संघातील स्थान पक्के करणार आहे.