IPL 2024 : मयांकमुळे संघनिवडीसाठी वेगवान चुरस

आगामी टी-20 वर्ल्ड कपची निवड चाचणी म्हणून आयपीएलकडे पाहिले जाणार, हे स्पष्ट होतेच आणि जो आयपीएलमध्ये चमकणार त्याचे नशीबही फळफळणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे संघात स्वतःचे स्थान पक्के असलेल्या खेळाडूला आयपीएलमध्ये अपयश आल्यास अमेरिका वारी मुकावी लागू शकते. सध्या स्पीडस्टार मयांक यादवची हवा असून त्याच्या वेगाचे अवघे क्रिकेट विश्व दिवाने झाले आहे. त्यामुळे पदार्पणातल्या दोन्ही सामन्यांत सामनावीर ठरलेल्या मयांकची टी-20 वर्ल्ड कप संघात निवड व्हावी म्हणून आतापासूनच वारे वाहू लागले आहेत.

त्यामुळे या नव्या दमाच्या वेगवान गोलंदाजाला आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची लॉटरी लागल्यास कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. मात्र मयांकमुळे सध्या आऊट ऑफ फॉर्म असलेल्या मोहम्मद सिराजचा वर्ल्ड कपमधून पत्ता कट होण्याची शक्यता बळावली आहे. कारण सिराजच्या जागी तोच फिट बसू शकतो. मात्र आयपीएलमध्ये सिराजची कामगिरी सुधारली नाही तर त्याला अमेरिका वारी विसरावी लागू शकते.

लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयांक यादवने पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीने आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने 4 षटकांत केवळ 27 धावांच्या मोबदल्यात 3 बळी टिपत मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धही 4 षटकांत 14 धावांत 3 फलंदाज बाद करीत आपले नाणे पुन्हा खणखणीत वाजवून दाखवले.

मयांक यादवच्या ताशी 156 व 157 किमी वेगाच्या चेंडूची सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात त्याने आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये सर्वांना इतके प्रभावित केले आहे की आता मयांक यादवला टी-20 वर्ल्ड कपसाठी खेळवण्याची मागणीही वाढू लागली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडीजच्या खेळपट्टय़ांवर मयांक यादव टीम इंडियासाठी सरप्राईज पॅकेज ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1 जूनपासून सुरू होणाऱया टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड एप्रिलच्या अखेरीस होणार आहे. एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक बळी टिपणारा मोहम्मद शमी टी-20 वर्ल्ड कपसाठी फिट नाही. शस्त्रक्रिया झाल्याने तो आयपीएलमध्येही खेळत नाही. अशा परिस्थितीत मयांक यादवची टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात निवड होऊ शकते.

आयपीएलमध्ये आणखीही सरप्राईज पॅकेज

मोहम्मद सिराज टी-20 फॉरमॅटमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे आगामी टी-20 वर्ल्ड कपमधून त्याचा पत्ता कट होऊ शकतो. त्याचबरोबर मोहित शर्माच्या नावाचीही सातत्याने चर्चा होत आहे. आता या शर्यतीत मयांक यादवही उतरला आहे. ‘बीसीसीआय’च्या संघनिवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती मास्टरस्ट्रोक खेळून टीम इंडियाला मयांक यादवच्या रूपाने सरप्राईज पॅकेज देणार काय, याकडे तमाम क्रिकेटशौकिनांच्या नजरा असतील. आता आयपीएलची सुरुवात काही हिंदुस्थानचा निम्मा संघ अजूनही ठरायचा बाकी आहे. त्यामुळे आयपीएल हिंदुस्थानी संघाला आणखीही काही सरप्राईज देऊ शकतो.