सोने @ 72,000; दराने गाठला नवा उच्चांक

ऐन लग्नसराईच्या मोसमात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर प्रतितोळा 71 हजार 700 रुपयांवर पोहोचले असून ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. विशेष म्हणजे अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून यामध्ये लोक मोठय़ा प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिलला सोन्याच्या दराने 69 हजार रुपयांची पातळी गाठली. त्या तुलनेत बुधवारी सोन्याचे दर 72 हजार रुपयांवर पोहोचले. त्यामुळे सोने खरेदीदारांना मोठा फटका बसतोय.