…म्हणून शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला; उन्मेष पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

भाजपचे जळगावातील विद्यमान खासदार उन्मेष पाटील आणि पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी पाटील यांचे शिवसेनेत स्वागत केले. पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेची तारद वाढणार असल्याचे ते म्हणाले. तसेच आपली लढाई आत्मन्मानासाठी अशून शिवसेनेच्या मशालीची धग गावागावापर्यंत पोहचवण्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.

भाजपचे जळगावातील विद्यमान खासदार उन्मेष पाटील आणि पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. उन्मेष पाटील यांची उत्तर महाराष्ट्रातील भाजपने निष्ठावान नेते अशी ओळख होती. मात्र, भाजपत निष्ठावंतांच्या नशिबी नेहमी संघर्ष असतो. आता ते निष्ठावंतांची कदर करणाऱ्या शिवसेनेत आले आहेत. त्यांच्या शिवसेनाप्रवेशामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. त्यांच्यासारखा संघर्ष करणारा नेता उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभा राहिला, याबाबत त्यांचे अभिनंदन करत आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच त्यांच्या शिवसेनाप्रवेशामुळे जळगावची निवडणूक रंगतदार होणार असून शिवसेनेला विजयाकडे नेईल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

राजकारण करताना आमदार, खासदार या पदांसाठी काम केले नाही. ही पदे साधन असून लोकांसाठी त्याचा फायदा होईल, या हेतूनेच आपण काम करत होतो. त्यामुळे खासदारकीचे तिकीट मिळाले नाही म्हणून पक्ष सोडलेला नाही. आपण केलेल्या विकासाची किंमत भाजपला नाही. आपली अवहेलना करण्यात आली, अशी खंत उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली. आपण बदल करण्यासाठी काम करत असून बदला घेण्यासाठी काम करत नाही. मात्र, सध्या सुरू असलेल्या बदल्याच्या राजकारणाने आपण व्यथीत होत आहोत. जनतेला बदलाचे राजकारण हवे आहे. त्यासाठी सकारात्मक राजकारण करणार असल्याचे उन्मेष पाटील यांनी सांगितले. सध्याचे बदल्याचे राजकारण राज्याला घातक असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला मान,सन्मान नको, आमच्या स्वाभिमानाला धक्का पोहचवण्यात आला. माझी लढाई पदासाठी नसून आत्मसन्मानासाठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आपण सहकाऱ्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. आता शिवसेनेच्या मशालीची धग गावागावापर्यंत नेत विकासाचे राजकारण करणार आहे, असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.