रुग्णालयातील ‘तंत्रज्ञांना’ आता निवडणूक कामातून वगळणार; म्युनिसिपल कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

पालिकेच्या रुग्णालयांत काम करणाऱया तंत्रज्ञांना आता निवडणूक कामातून वगळण्यात येणार आहे. तंत्रज्ञांना निवडणुकीचे काम दिल्यास रुग्ण सेवा कोलमडून पडण्याचा धोका होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणीत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर पालिका प्रशासनाने हे आश्वासन दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पालिकेचा सुमारे 40 ते 50 हजार कर्मचारी वर्ग नेमण्याचे निश्चित आहे. मात्र यात अत्यावश्यक सेवेतील रुग्णालये, फायर ब्रिगेडमधील कर्मचाऱयांना वगळावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने तत्कालीन आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती, असे कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले. याची पालिका प्रशासनाकडून दखल घेण्यात आली असून निवडणूक कामातून रुग्णालयातील तंत्रज्ञ कर्मचाऱयांना वगळण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले असल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी सांगितले. म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या मागणीची दखल घेऊन पालिका रुग्णालयातील डॉक्टर व नर्सिंग यांचे निवडणूक कर्तव्याचे आदेश रद्द केले. मात्र अत्यावश्यक सेवेतील तंत्रज्ञ संवर्गाला वरील कर्तव्यातून सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर, सेव्रेटरी संजय वाघ व सल्लागार हरीश जामठे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वय अधिकारी सतीश बागल यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेनंतर पालिका रुग्णालयातील रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, डायलिसीस तंत्रज्ञ यासंवर्गातील कर्मचाऱयांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे डॉ. बापेरकर यांनी सांगितले.