दंगल उसळवण्याचा कट भाजपच्या अंगलट येणार; नितेश राणे, गीता जैन, टी. राजा यांच्या अडचणीत वाढ

mumbai-highcourt

निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक दंगल उसळवण्याचा कट भाजपच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. भडकावू विधाने देणाऱया भाजप आमदार नितेश राणे, गीता जैन आणि टी. राजा यांच्याविरोधातील फौजदारी रिट याचिकेची सोमवारी उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि तातडीने 8 एप्रिलला सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली.

भाजप आमदारांनी मीरा रोड, मालवणी, गोवंडी, घाटकोपर आदी ठिकाणी भडकावू विधाने करीत धार्मिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवून पुढील कारवाई करण्याचे निर्देश द्या, अशी मागणी करीत खार येथील शिक्षिका अफताब सिद्विकी व इतरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांची याचिका सोमवारी अॅड. विजय हिरेमठ यांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली. खंडपीठाने आरोपांचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने 8 एप्रिलला सुनावणी निश्चित केली. त्यामुळे भाजप आमदारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

z लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही भडकावू विधाने करून मतदारांवर दबाव टाकला जात आहे. हा दंगल भडकावण्याचाच कट असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालय कोणते निर्देश देतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.