पृथ्वीराज चव्हाणांचे साताऱयातून निवडणूक लढण्याचे संकेत

सातारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. साताऱयाचे मावळते खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचे कारण पुढे करून लोकसभा निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे शरद पवार साताऱयात तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात आहेत.

त्यामुळे सध्या शरद पवार गटाकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नावांची चर्चा आहे. तथापि, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच कराड येथे पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे साताऱयाचे संभाव्य उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे आले आहे.

या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पवार यांच्या पक्षाच्या चिन्हावर लढण्याचे संकेत आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिले. शरद पवारांनी आदेश दिला तर मी लढायला तयार आहे, असे सांगत चव्हाण यांनी भाजपचे साताऱयामधील संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याशी दोन हात करण्याची तयारी दर्शवली.

तब्बल 25 वर्षांनंतर लोकसभेच्या मैदानात

1999च्या लोकसभा निवडणुकीत कराड मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांना श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून लोकसभा निवडणूक लढविल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना 1999नंतर लोकसभा लढविण्याची संधी मिळाली नाही. आता तब्बल 25 वर्षांनंतर पृथ्वीराज चव्हाण लोकसभा निवडणूक लढविण्याची
शक्यता आहे.

शरद पवारांचे वर्चस्व

पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांपैकी सातारा हा मतदासंघ शरद पवार यांच्या गटासाठी सुरक्षित मानला जातो. पक्षाने स्थापनेपासून सातारा आणि कराडची जागा जिंकली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेपासून सातारा मतदारसंघावर शरद पवार यांचे वर्चस्व राहिले आहे.